मुंबई: अलीकडच्या काळात राज्यातील प्रमुख सहकारी बँकांपैकी एक म्हणून नावारुपाला आलेल्या मुंबै बँकेला (Mumbai Bank) सहकार भवन बांधण्यासाठी गोरेगावच्या आरे कॉलनी येथील पशू संवर्धन विभागाच्या मालकीची तीन एकर जागा (Animal Husbandry Department Land) देण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. तसा शासकीय आदेश सोमवारी दुपारी महाराष्ट्र शासनाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध झाला होता. मात्र, काहीवेळातच या आदेशाची प्रत महाराष्ट्र शासनाच्या संकेतस्थळावरुन हटवण्यात आल्याने चर्चांना उधाण आले आहे. भाजपचे आमदार प्रवीण दरेकर हे मुंबै बँकेचे अध्यक्ष आहेत.
 
काही दिवसांपूर्वीच दुग्ध विकास  विभागाची कुर्ला येथील साडेआठ हेक्टर जागा 25 टक्के सवलतीच्या दरात धारावी पुनर्विकास प्रकल्पासाठी देण्याच्या निर्णयावरुन प्रचंड टीका झाली होती. अशातच आता पशू संवर्धन विभागाच्या मालकीची जागा मुंबै बँकेला देण्यात आल्याने नव्या वादाला तोंड फुटण्याची शक्यता आहे. प्राथमिक माहितीनुसार, मुंबै बँकेला देण्यात आलेली गोरेगाव येथील तीन जमीन जागा महाराष्ट्र पशू व मत्स्य विज्ञान विद्यापाठीच्या मालकीची आहे.  सध्या या जागेवर पशुवैद्यक महाविद्यालय कार्यरत आहे. 


या जागेशी तुकाराम मुंढेंचं कनेक्शन


मुंबै बँकेला सहकार भवन बांधण्यासाठी देण्यासाठी ही जागा उपलब्ध करुन द्यावी, यासाठी काही दिवसांपूर्वीच मुंबई उपनगरचे जिल्हाधिकारी आणि कोकण विभाकीय आयुक्तांनी प्रस्ताव मांडला होता. यावर पशू संवर्धन विभागाचे तत्कालीन सचिव तुकाराम मुंढे यांनी या प्रस्तावाबाबत विद्यापीठाचा अभिप्राय मागवण्याचे आदेश दिले होते. विद्यापीठाच्या कार्यकारी समितीने सुरुवातीला मुंबै बँकेच्या सहकार भवनासाठी ही जमीन द्यायला विरोध केला होता. मात्र, तुकाराम मुंढे यांच्या बदलीनंतर कार्यकारी समिती आणि विद्यापीठाच्या कुलसचिवांनी या प्रस्तावाला सहमती दिली होती.


मुंबै बँकेला एका अटीच्या मोबदल्यात जागा?


पशुसंवर्धन विभागाची  ही जागा मुंबै बँकेला सहकार भवनासाठी देताना एक अट घालण्यात आल्याचे सांगितले जाते.  नवशाचा पाडा येथील अतिक्रमणांवर सुरक्षा भिंत बांधण्यासाठी पशू वैद्यकीय महाविद्यालयास निधी उपलब्ध करुन दयावा. तसेच मुंबई पशुवैद्यक महाविद्यालयाच्या परळ आणि गोरेगाव कॅम्पसमधील प्रस्तावित विकासकामांसाठी 100 कोटी रुपयांचा निधी द्यावा, अशी अट पशुसंवर्धन विभागाने घातली आहे. मात्र, ही अट मुंबै बँकेसाठी आहे की महसूल विभागासाठी आहे, याबाबत अद्याप पुरेशी स्पष्टता नाही. 


तसेच मुंबै बँकेच्या सहकार भवनामुळे भविष्यात पशुवैद्यकीय महाविद्यालयाच्या शैक्षणिक, संशोधन, विस्तार आणि अभ्यासक्रमेतर उपक्रमांमध्ये अडथळा येणार नाही. तसेच विद्यार्थ्यांची सुरक्षा प्रस्तावित प्रकल्पामुळे धोक्यात येऊ नये, याची दक्षता घेण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. 


मुंबै बँकेला जमीन देण्यावरुन राजकीय वाद


पशुसंवर्धन विभागाच्या मालकीची तीन एकर जमीन मुंबै बँकेला भाडे तत्त्वावर की मालकी तत्तावर देण्यात आली आहे, याबाबत अद्याप स्पष्टता नाही. या सगळ्यामुळे राजकीय वादाला तोंड फुटण्याची शक्यता आहे. मुंबै बँकेला जमीन देण्याचा निर्णय कोणी घेतला, याबाबत मंत्रालयात कुजबूज सुरु आहे. कोणाच्या हितासाठी आणि कोणाच्या दबावाने हा निर्णय घेण्यात आला, याची चौकशी करा, अशी मागणी विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी केली. यानंतर विजय वडेट्टीवार यांनीही सहकार भवन बांधण्याची जबाबदारी मुंबै बँकेला का दिली, राज्य सरकारने ही जबाबदारी स्वत: घ्यायला पाहिजे होती, असे म्हटले. हा सगळा वाद तापल्यानंतर शासनाच्या संकेतस्थळावरुन आदेशाची प्रत अचानक हटवण्यात आल्याचे सांगितले जाते. 


इतर बातम्या


राज ठाकरेंना सुपारीबाज म्हणणाऱ्या अमोल मिटकरींना मनसेच्या नेत्याने झोडपलं, म्हणाला, टी शर्टवर पेन लावणारा....