मुंबई : महालक्ष्मी रेसकोर्सची (Mahalakshmi Race Course ) जागा ही फक्त गार्डनसाठीच वापरली जाणार असल्याचं स्पष्टीकरण पालिका आयुक्त इक्बालसिंह चहल (Iqbal Singh Chahal) यांनी केली आहे. कोस्टल रोड आणि महालक्ष्मीचं गार्डन आम्ही सबवेने जोडू आणि मुंबई सेंट्रल पार्क उभारणार असल्याची माहिती देखील यावेळी पालिका आयुक्तांनी दिली. महालक्ष्मी रेसकोर्सचा मुद्दा हा 2013 पासून आहे. माझी त्यांच्यासोबत चर्चा देखील सुरु आहे आणि 12 ते 13 बैठका देखील झाल्या आहेत, अशी माहिती देखील यावेळी इक्बालसिंह चहल यांनी दिलीये. 


महालक्ष्मी रेसकोर्सवरुन आदित्य ठाकरे यांनी काही आरोप केले आहेत. त्यावर देखील इक्बालसिंह चहल यांनी स्पष्टीकरण दिलीये. मुंबईचा हा भाग जवळपास 1 लाख एकरचा आहे. संजय गांधी पार्क सोडून आणि पब्लिक गार्डन पार्क सोडून एकूण 140 एकर ही जागा आहे. त्यामुळे असं ठरलंय की 91 एकरमध्ये रेसकोर्स चालेल आणि बाकी  जागा ही पार्कसाठी वापरली जाणार असल्याचं पालिका आयुक्तांनी सांगितलं. 


लंडन सेंट्रल पार्कसारख्या पार्कची उभारणी करणार


ठाकरे गटाचे नेते आदित्य ठाकरे यांनी ही जागा बिल्डरच्या घशात घालणार असल्याचा आरोप केलाय. त्यावर पालिका आयुक्त यांनी म्हटलं की, ही जागा बिल्डरकडे देणार ही गोष्ट बकवास आहे. त्यामुळे महालक्ष्मीची जागा फक्त गार्डनसाठीच वापरली जाईल. लंडन सेंट्रल पार्कसारख्या पार्कची देखील आमची योजना आहे. रेसकोर्सच्या सदस्यांसोबत बैठक देखील बोलावली होती. त्या बैठकीमध्ये मी त्यांना सांगितलं की, इकडे गार्डन होणार म्हणून मी अॅफिडेव्हिट द्यायला तयार आहे, असंही पालिका आयुक्तांनी सांगितलं. 


लोकांनी मला सपोर्ट करावा - पालिका आयुक्त


दोन गार्डन जोडण्याचा आमचा प्रयत्न असणार आहे. कोस्टल रोड आणि महालक्ष्मीचं गार्डन आम्ही सबवेने जोडू आणि मुंबई सेंट्रल पार्क उभारु. त्यासाठी लोकांनी आम्हाला पाठिंबा द्यावा. 300 एकर जागेवर आम्ही हे पार्क उभारणार आहोत. एमआयू आम्ही ड्राफ्ट करतोय, ज्यामध्ये सरकार, पालिका आणि रेसकोर्सच्या सदस्यांमध्ये हा एमओयू होणार. त्यानंतर कॅबिनेटकडून हा निर्णय घेतला जाईल. निर्णय घेतल्यानंतर ऑर्डर पास होईल आणि मग काम सुरु केले जाईल. त्यामुळे बिल्डर इथे येऊन बांधकाम करणार या गोष्टींना काही अर्थ नाही, असं पालिका आयुक्त म्हणाले. 


आदित्य ठाकरेंचा आरोप काय? 


आदित्य ठाकरे यांनी काही दिवसांपूर्वी महालक्ष्मी रेस कोर्सची जागा राज्य सरकारच्या जवळच्या बिल्डर मित्राकडून बळकवण्याचा प्रयत्न होत असून संबंधित बिल्डर हा त्या ठिकाणच्या व्यवस्थापनाला धमकवत असून करार करण्यासाठी दबाव टाकत असल्याचा आरोप केला होता. त्यानंतर आदित्य ठाकरे यांनी ट्वीट करत  रेसकोर्सच्या जागेसंदर्भात मागील महिन्यात बैठक झाली असून दोन तीन व्यक्ती मुंबईतील मोकळी जमीन कंत्राटदार-बिल्डरला देऊ शकत नाही. या मोकळ्या जागेवर एक वीटही रचू देणार नसल्याचा इशारा दिला होता. 


ही बातमी वाचा : 


Devendra Fadnavis : छगन भुजबळ भाजपात प्रवेश करणार? अंजली दमानियांच्या दाव्यावर देवेंद्र फडणवीसांचं मोठं वक्तव्य