Devendra Fadnavis : छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) हे भाजपच्या वाटेवर असल्याची पोस्ट सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया (Anjali Damania) यांनी एक्सवर लिहिली आहे. त्यांच्या या पोस्टवर राजकीय वर्तुळातून अनेक प्रतिक्रिया येत आहेत. राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनीही या प्रकरणावर आपली प्रतिक्रिया दिली आहे.  


गेल्या काही दिवसांपासून छगन भुजबळ आक्रमकपणे ओबीसी आरक्षणाचा मुद्दा मांडत आहेत. काही वर्षांपूर्वी अंजली दमानिया यांनी छगन भुजबळांवर भ्रष्टाचाराचे आरोप केले होते. या पार्श्वभूमीवर त्यांनी एक्सवर छगन भुजबळांवरील आरोपांचा संदर्भ घेत भाजपाला लक्ष्य केले आहे. अंजली दमानिया यांनी पोस्टमध्ये  म्हटले आहे की, "भुजबळ भाजपाच्या वाटेवर?, एकेकाळी भुजबळांच्या भ्रष्टाचाराविरुद्ध जनहित याचिका करणारा भाजपा त्यांना मोठा ओबीसी नेता बनवणार? अशा भ्रष्ट माणसांना मोठे करणार, राजकारणासाठी? कुठे फेडाल हे पाप” अशी पोस्ट त्यांनी लिहिली आहे. त्यामुळे छगन भुजबळ हे भाजपाच्या वाटेवर आहेत का, अशी जोरदार चर्चा सोशल मीडियावर सुरु झाली आहे.


अंजली दमानिया सुप्रिया सुळेंच्या जास्त संपर्कात - देवेंद्र फडणवीस


यावर राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) म्हणाले की, आमच्या पक्षाचे निर्णय आम्ही घेतो. अंजली दमानिया घेत नाहीत.  अलीकडच्या काळात अंजली दमानिया सुप्रिया सुळेंच्या (Supriya Sule) जास्त संपर्कात आहेत. त्यामुळे त्या अशा प्रकारचे ट्विट करत असतील. पण, भुजबळ साहेब त्यांच्या पक्षात आहेत आम्ही आमच्या पक्षात आहोत, अशी प्रतिक्रिया फडणवीस यांनी दिली आहे. 


काय म्हणाले छगन भुजबळ?


दरम्यान, अंजली दमानियांच्या पोस्टवर छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे.  त्यांना कशी माहिती मिळाली. हे मला माहीत नाही. मला कुठल्या पदाची हौस नाही. गेल्या अनेक वर्षांपासून मी ओबीसींसाठी काम करत आहे. नवीन काही आता मला पाहिजे असे काही नाही, असे काही प्रपोजल मला आले नाही. पक्षात काय घुसमट आहे? मी मंत्री आहे, माझ्या विरुद्ध अजून तरी कोणी काही बोललेले नाही. मी जे काही करतोय त्याबाबत अजित दादाही म्हणालेत की ते ओबीसींचे काम करत आहेत. त्यांना तो हक्क आहे. तुम्ही तुमच्या समाजाबद्दल बोलतात तसे ते देखील त्यांच्या समाजाबाबत बोलत आहेत, असे छगन भुजबळ यांनी म्हटले आहे. 


आणखी वाचा 


Raj Thackeray PC : तुम्ही महाविकास आघाडीसोबत जाणार का? राज ठाकरेंचं एका वाक्यात उत्तर!