मुंबई : ''वन ट्रिलियन डॉलर अर्थव्यवस्थेचं उद्दीष्ट ठेवणारं महाराष्ट्र हे देशातील पहिलं राज्य आहे. हे उद्दीष्ट नक्की पूर्ण होईल, कारण महाराष्ट्र ही छत्रपती शिवाजी महाराजांची भूमी आहे,'' असं म्हणत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राज्य सरकारच्या कामगिरीचं कौतुक केलं.

मुंबईतील बीकेसीत सुरु असलेल्या मॅग्नेटिक महाराष्ट्र कार्यक्रमांचं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आलं. या कार्यक्रमाला राज्यपाल सी. विद्यासागर राव, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, सुरेश प्रभू, केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, सुधीर मुनगंटीवार, सुभाष देसाई, विनोद तावडे, उद्योजक रतन टाटा, मुकेश अंबानी यांच्यासह ग्लोबल बिझनेस लिडर्स मंचावर उपस्थित होते.

फडणवीस सरकारच्या इज ऑप डुंईंग बिझनेसने महाराष्ट्राला गतीमान केलं. गेल्या वर्षी देशात आलेल्या एकूण परकीय गुंतवणुकीपैकी 51 टक्के गुंतवणूक महाराष्ट्रात आली. सध्या 2 लाख कोटींच्या गुंतवणुकीवर काम सुरु आहे. मेट्रोचं जाळं वाढत आहे, असं पंतप्रधान मोदी म्हणाले.

सबका साथ सबका विकाससाठी महाराष्ट्र केंद्र सरकारचं ट्रस्टेड पार्टनर : मुख्यमंत्री


सबका साथ सबका विकास हे घोष वाक्य सत्यात उतरवण्यासाठी महाराष्ट्र केंद्र सरकारचं ट्रस्टेड पार्टनर असेल, अशी ग्वाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या कार्यक्रमात बोलताना दिली. ‘मेक इन महाराष्ट्र’च्या माध्यमातून 4.91 कोटींच्या गुंतवणुकीतून 61 टक्के करार पूर्णत्वास नेले, असा दावाही मुख्यमंत्र्यांनी केला.

मुख्यमंत्र्यांच्या भाषणातील मुद्दे

  • इज ऑफ डुईंग बिझनेसमध्ये भारताचा पहिला क्रमांक

  • वर्षभरात 300 टक्क्यांनी FDI वाढला

  • महाराष्ट्राला 2020 पर्यंत वन ट्रिलियन इकॉनॉमी बनवण्याचा ध्यास

  • 5 ते 10 वर्षात मटेरियल इकॉनॉमीची जागा डिजिटल इकॉनॉमी घेईल

  • 24 लाख कृषी क्षेत्रातील स्किल्ड कामगारांना रोजगार देऊ

  • 300 फिनटेक स्टार्टअप्स सुरू करण्यासाठी धोरण तयार

  • अवकाश आणि संरक्षण क्षेत्र, इ- व्हेईकल धोरण, एकात्मिक औद्योगिक धोरण तयार इन्फ्रास्ट्रक्चर गुंतवणुकीत DEUTSCH बँकेने महाराष्ट्राला पहिला क्रमांक दिला

  • नागपूर -मुंबई समृद्धी महामार्ग 24 जिल्ह्यांना JNPT पोर्टला जोडणार

  • 25 इंटिग्रेटेड लॉजिस्टिक आणि टेक्सटाईल पार्क तयार करणार


मुकेश अंबानी यांचं मराठीत भाषण

"मी अभिमानाने सांगतो की महाराष्ट्र हे महत्वकांक्षी राज्य आहे", असं म्हणत रिलायन्स इंडस्ट्रिजचे चेअरमन मुकेश अंबानी यांनी मराठीतून भाषणाला सुरुवात केली.

''महाराष्ट्र माझी जन्मभूमी तर आहेच पण कर्मभूमीही आहे. रिलायन्सने गेल्या काही वर्षात 2 लाख 50 हजार कोटींच्या गुंतवणुकीपैकी सर्वाधिक गुंतवणूक महाराष्ट्रात केली आहे,'' अशी माहितीही मुकेश अंबानींनी दिली.

''पंतप्रधान मोदींनी दूरदृष्टी ठेऊन कामं केली, पण सर्वात महत्वाचं म्हणजे लोकांचा दृष्टिकोन बदलण्याचं काम केलं. चीनने उत्पादनात जे यश मिळवलं त्यापेक्षा भारत पंतप्रधानांच्या नेतृत्वात अधिक यश मिळवू शकतो,'' असा दावाही मुकेश अंबानींनी केला.

''मुंबई-पुणे प्रवास 15 ते 20 मिनिटात शक्य''

व्हर्जिन हायपरलूपच्या माध्यमातून मुंबई ते पुणे प्रवास 15 ते 20 मिनिटात करता येईल, असा दावा व्हर्जिन हायपरलूपचे रिचर्ड ब्रँसन यांनी केला. यामुळे वेळ, पैसा आणि अपघातांची संख्या कमी होण्यास मदत होईल. हायपरलूप एक हजार किमी प्रति तास वेगाने धावते. 15 कोटी प्रवाशांना याचा फायदा होईल, असंही ब्रँसन म्हणाले.

उद्योगासाठी महाराष्ट्रासारखी भूमी नाही : रतन टाटा

''महाराष्ट्र उद्योग क्षेत्रासाठी कायम अग्रेसर राज्य राहिलं आहे. मात्र गेल्या काही वर्षात इन्फ्रास्ट्रक्चर मर्यादेमुळे उद्योग वाढीस बाधा निर्माण होत होती. आता पंतप्रधान आणि मुख्यमंत्र्यांच्या सहाय्याने त्यावर तोडगा काढण्याचे प्रयत्न सुरू झाले आहेत,'' असं टाटा ग्रुपचे चेअरमन रतन टाटा म्हणाले.

दरम्यान, ''मुकेश अंबानी यांनी कम्युनिकेशन क्षेत्रात जी क्रांती आणली आहे, ती स्वागतार्ह आहे,'' असंही रतन टाटा म्हणाले.

''मी माझं संपूर्ण आयुष्य महाराष्ट्रात घालवलं आणि मी दाव्याने सांगू शकतो की उद्योग क्षेत्रासाठी या महाराष्ट्रासारखी भूमी नाही,'' असंही रतन टाटांनी सांगितलं.

उद्योग क्षेत्राबाबत आनंद महिंद्रा यांची चिंता

महिंद्रा ग्रुपचे चेअरमन आनंद महिंद्रा यांनी उद्योग क्षेत्राबाबत चिंता व्यक्त केली. मुंबई एक ब्रह्मास्त्र आहे, तसंच दुधारी तलवार आहे. जर मुंबईचं गैरव्यवस्थापन झालं तर गुंतवणूकदार दूर लोटले जातील, असं आनंद महिंद्रा म्हणाले.

''आम्ही आमच्या कांदिवलीच्या जमिनीवर फिल्म आणि एंटरटेनमेंटवर आधारित पर्यटन सुरू करण्याचा प्रयत्न करतोय. यासाठी आम्ही 1700 कोटींची गुंतवणूक करण्याचा विचार करत आहोत,'' अशी माहिती आनंद महिंद्रा यांनी दिली.

काय आहे मॅग्नेटिक महाराष्ट्र 2018?

मॅग्नेटिक महाराष्ट्र-कन्व्हर्जन्स 2018 हा महत्वकांक्षी उपक्रम महाराष्ट्र सरकारच्या उद्योग विभागामार्फत मुंबईत वांद्रे-कुर्ला कॉम्प्लेक्स (बीकेसी) येथे आयोजित करण्यात आला आहे. राज्याच्या औद्योगिक वाढीसाठी हा कार्यक्रम उपयुक्त असल्याचं राज्य सरकारचं म्हणणं आहे.

मॅग्नेटिक महाराष्ट्र कार्यक्रमाची प्रमुख उद्दीष्ट

  • या कार्यक्रमाच्या माध्यमातून 10 लाख कोटींची गुंतवणूक आणण्याचं सरकारचं उद्दिष्ट आहे

  • या कार्यक्रमात 4500 सामंजस्य करार होणार आहेत

  • विविध क्षेत्रात 35 लाख रोजगार निर्मितीची संधी उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न

  • अवकाश आणि संरक्षण उत्पादन, वस्त्रोद्योग, इ-व्हेईकल्स, खाद्यान्न प्रक्रिया आणि लघु व मध्यम उद्योग या क्षेत्रांवर विशेष भर


उद्योग क्षेत्रातील दिग्गजांची उपस्थिती

या जागतिक परिषदेला रिलायन्स इंडस्ट्रीजचे चेअरमन मुकेश अंबानी आणि महिंद्राचे आनंद महिंद्रा यांच्याखेरीज विदेशी उद्योजकांची उपस्थिती होती. व्हर्जिन हायपरलूपचे रिचर्ड ब्रॅन्सन, इमर्सनचे एडवर्ड मॉन्सर, जगप्रसिद्ध कार कंपनीचे टोनिनो लॅम्बोर्घिनी यांची मुख्य उपस्थिती होती.

यासोबतच स्वीडनचे सचिव कॅरीन रोडिंग, कॅनडाचे लघु उद्योग मंत्री बार्दिश चॅग्गर तसेच नीती आयोगाचे सीईओ अमिताभ कांत हे उपस्थित होते.

राज्यातील उद्योजकांना प्रोत्साहन देण्यासाठी राज्य सरकारकडून उद्योग क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या उद्योजकांना राज्य पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार आहे. मॅग्नेटिक महाराष्ट्र - कन्व्हर्जन्स 2018 या परिषदेत दुसऱ्या दिवशी 19 फेब्रुवारीला एका कार्यक्रमात हे पुरस्कार देण्यात येणार आहेत. माहिती तंत्रज्ञान, निर्यात यांसारख्या वेगवेगळ्या क्षेत्रातील 47 मान्यवरांना या पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार आहे.

मॅग्नेटिक महाराष्ट्र 2018 कार्यक्रमाचं स्वरुपः

18 फेब्रुवारी :

मुंबईतील वांद्रे-कुर्ला कॉम्प्लेक्स येथील एमएमआरडीए ग्राऊंड येथे 18 ते 20 फेब्रुवारी या कालावधीत आयोजित या परिषदेचं उद्‍घाटन 18 फेब्रुवारीला सायंकाळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते झालं. तर प्रदर्शनाचं उद्घाटन 7.15 मिनिटांनी झालं. यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह इतर मंत्री उपस्थित होते. याच दिवशी मोठ्या कंपन्यांच्या निवडक सीईओंसह पंतप्रधान चर्चा करणार आहेत. याशिवाय सांस्कृतिक कार्यक्रमांचंही आयोजन करण्यात आलं आहे.

19 फेब्रुवारी :

सकाळी 10 वाजल्यापासून विविध चर्चासत्रांना सुरुवात होणार आहे. यात प्रामुख्याने फ्युचर इंडस्ट्री, सस्टेनेबिलीटी, एम्प्लॉयमेंट आणि इंफ्रास्ट्रक्चर या विषयांवर चर्चा होणार आहे. यात नवे तंत्रज्ञान, स्मार्ट सिटीज, निर्यात, सप्लाय चेनसह ‘जर्नी टू ट्रिलीयन डॉलर इकॉनॉमी’ हा मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली विशेष परिसंवाद होणार आहे. सायंकाळी स्टार्टअप पुरस्कार आणि उद्योगरत्न पुरस्कार रजनी होणार आहे.

20 फेब्रुवारी :

सकाळी 10 वाजल्यापासून तीन हॉलमध्ये एकाच वेळी वेगवेगळ्या विषयांवरील चर्चासत्र होणार आहेत. यात जलसंधारण, महिला उद्योगधोरण, इज आफ डुईंग बिझनेस, मुंबई फायनान्शियल हब, मेक इन महाराष्ट्र 2.0 यांचा समावेश आहे. सायंकाळी 4.30 वाजता परिषदेचा सांगता समारंभ होईल.