मुंबई: मशिदींच्या लाऊडस्पीकरबाबत सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाचे पालन न केल्याप्रकरणी मुंबई पोलिसांनी दोन मशिदींच्या ट्रस्टीविरोधात गुन्हे दाखल केले आहेत. वांद्रे येथील नुरानी मशिद आणि सांताक्रूझ येथील लिंक रोडवर असलेल्या कबरस्तान मशिदीच्या ट्रस्टींवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सकाळी 6 ते रात्री 10 वाजेपर्यंत कोणी स्पीकर वाजवत असेल, तर निश्चित केलेल्या डेसिबलच्या नियमांचे पालन करणे बंधनकारक आहे असं मुंबई पोलिसांनी स्पष्ट केलं आहे.
सर्वोच्च न्यायालयाच्या नियमांचे पालन वांद्रे येथील नुरानी मशिदीच्या व्यवस्थापनानं केलं नसल्याचं निदर्शनास आल्यानंतर वांद्रे पोलिसांनी त्यांच्याविरुद्ध भादंवि कलम 188 आणि महाराष्ट्र पोलिसांच्या कलम 37 (1), (3), 135 नुसार तक्रार दाखल केली आहे. कायदा आणि ध्वनी बंदी नियमांचे कलम. 33 (R)(3) अंतर्गत हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याशिवाय मुंबईच्या सांताक्रूझ पोलिसांनी लिंक रोडवर असलेल्या कबरस्तान मशिदीशी संबंधित लोकांवरही नियमांकडे दुर्लक्ष केल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे.
पोलिसांच्या सूत्रांनी सांगितले की, गुरुवारी सकाळी वांद्रे येथील नुरानी मशिदीमध्ये लाऊडस्पीकरवर नमाज अजान करण्यात आली. सकाळी 6 च्या आधी लाऊडस्पीकर न वापरण्याबाबत पोलिसांनी एक दिवस अगोदर सूचना देऊनही मशिदीत सकाळच्या अजानसाठी लाऊडस्पीकर वापरण्यात आले.
त्यानंतर सुप्रीम कोर्टाच्या मार्गदर्शक सूचनांचा भंग करत लाऊडस्पीकरवर दुपारची अजान मोठ्या आवाजात देण्यात आली. पोलिसांनी याची दखल घेत घटनास्थळी पोहोचून लाऊडस्पीकर मशीन ताब्यात घेतले. त्यानंतर पोलिसांनी भारतीय दंड संहितेच्या कलम 188 आणि महाराष्ट्र पोलीस कायद्याच्या कलमांनुसार कारवाई करून तक्रार दाखल केली आहे.
दरम्यान, मशिद व्यवस्थापन आणि पोलिसांमध्ये या विषयावर चर्चा झाल्याची माहिती आहे. यावेळी सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशांचे पालन सर्वांनी करावे असं आवाहन पोलिसांनी केलं आहे. सकाळच्या अजानच्या वेळी मशिदींकडून लाऊडस्पीकरचा वापर करण्यात येणार नाही, तसेच दिवसभर अजानवेळी डेसिबलच्या मर्यादेचे पालन करण्यात येईल असं आश्वासन मशिद व्यवस्थापनाने पोलिसांना दिलं आहे.
महत्त्वाच्या बातम्या:
- Loudspeaker Controversy : मशिदींमध्ये अजानसाठी लाऊडस्पीकरचा वापर हा 'मूलभूत अधिकार' नाही, हायकोर्टानं म्हटलं..
- पहाटे सहाच्या आधी मोजकेच दिवस होते अजान, मुस्लीम धर्मगुरूंचा दावा
- धार्मिक स्थळांनी शेगावच्या मंदिराचा घ्यावा आदर्श; परवानगी असूनही कमी आवाज होते आरती