Mumbai Crime : नालासोपाऱ्यात घडलेल्या एका हत्येच्या गुन्ह्यामध्ये परराज्यातील पोलिसांशी समन्वय साधत मुंबई पोलिसांनी आरोपींना जेरबंद केलं आहे. नालासोपाऱ्यात हत्या करुन फरार झालेल्या आरोपींना मेघालयमध्ये अटक करण्यात आलं आहे. याबाबत मेघालय पोलिसांनी ट्वीट करत माहिती दिली आहे. त्यांनी म्हटलं आहे की, मुंबईतील एका खुनाच्या गुन्ह्यासाठी काही नायजेरियन नागरिकांबद्दल मुंबई पोलिसांनी अलर्ट केलं होतं. यासाठी एक ऑपरेशन सुरू करण्यात आले आणि 6 नायजेरियन नागरिकांना लाड उमसॉ, रि-भोई येथे पकडण्यात आले. मुंबईत गुन्हा केल्यानंतर खालील नायजेरियन नागरिकांचा डावकी इंडियामार्गे भारतातून बांगलादेशात पळून जाण्याची तयारी होती, अशी माहिती मिळाली आहे.






नालासोपाऱ्यात नायजेरियन नागरिकांकडून नायजेरियन नागरिकाची हत्या


नालासोपाऱ्यात या नायजेरियन नागरिकांनी एका नायजेरियन नागरिकाची अपहरण करुन हत्या केल्याची घटना उघडकीस आली होती. अपहरण करतानाचा cctv व्हिडीओ देखील समोर आला आहे. नालासोपारा पूर्वेच्या प्रगतीनगर वस्तीत चार ते पाच नायजेरियन नागरिकांनी घरात घुसून एका नायजेरियन नागरिकाला मारहाण केली होती. त्यानंतर त्याचं अपहरण करून हत्या केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली. मायकल कीचेबाबा (वय 50) असं मयत नायजेरियन व्यक्तीचं नाव आहे. 3 मे रोजी आरोपींनी प्रगतीनगर इथल्या त्याच्या राहत्या घरी घुसून मारहाण केली होती. त्याला मारत मारत एका गाडीत बसवून त्याचं अपहरण करण्यात आलं. हा सर्व प्रकार रस्त्याकडेला लावलेल्या सीसीटीव्हीत कैद झाला होता.


गुरुवारी मायकलचा मृतदेह नायगाव परेरानगर इथल्या एका रूमच्या टॉयलेटमध्ये पोलिसांना आढळून आला.  सीसीटीव्हीत दिसत असलेल्या आरोपींनीच त्याची हत्या केली असल्याची माहिती समोर आली होती. अमली पदार्थांच्या आर्थिक व्यवहारातून ही हत्या झाल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. वळीव पोलिसांनी याप्रकरणी पाच ते सहा जणांविरोधात हत्येचा गुन्हा नोंद केला होता.