मुंबई : अंडरवर्ल्ड डॉन छोटा राजनचा हस्तक फरीद तनाशा याच्या हत्येचा आरोप असलेल्या 11 जणांना मुंबईतील विशेष मोक्का कोर्टानं दोषी ठरवलं आहे. याप्रकरणी न्यायाधीश एस.एम. भोसले यांनी 6 दोषींना हत्या आणि हत्येचा कट रचणे यासाठी दोषी ठरवून जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे. तर अन्य 5 दोषींना मोक्काअंतर्गत 10 वर्ष सक्तमजुरीची शिक्षा सुनावली.
2 जून 2010 रोजी चेंबूरमधील टिळक नगर परीसरात दिवसाढवळ्या फरीद तनाशाची त्याच्याच राहत्या घरी गोळ्या झाडून हत्या करण्यात आली होती. त्यावेळी फरीदसोबत त्याची पत्नी आणि मुलगी घरात उपस्थित होती. त्यादिवशी फरीदची तब्येत ठिक नसल्यानं दुपारच्यावेळी तो घरीच होता. अचानक दोन शूटर्सनी घरात घुसून बेडरूममध्ये झोपलेल्या फरीदवर बेछूट गोळीबार केला आणि ते पळून गेले. या हल्यात फरीदचा जागीच मृत्यू झाला होता. फरीद अंडरवर्ल्ड डॉन छोटा राजनसाठी काम करायचा. एका गुन्ह्यात साल 2005 ते 2008 मध्ये फरीदला जेलची हवाही खावी लागली होती.
सरकारी वकिलांनी कोर्टाला दिलेल्या माहितीनुसार चेंबूरमधील बिल्डर दत्तात्रय भाकरे यांनी एक भूखंड विकासासाठी घेतला होता. मात्र याला विरोध करत काही त्या सोसायटीच्या काही सभासदांनी फरीदची मदत घेतली. याचा राग येऊन दत्तात्रय भाकरेनं भरत नेपाळी या गँगस्टरला फरीदची सुपारी दिली. यासाठी भाकरेनं नेपाळीला 90 लाख रुपये दिले होते.
जन्मठेपेची शिक्षा सुनावलेल्यांमध्ये जफर खान, मोहम्मद साकिब खान, रविप्रकाश सिंग, पंकज सिंग, रणधीर सिंग आणि मोहम्मद रफिक शेख यांचा समावेश आहे. तर रवींद्र वारेकर, विश्वनाथ शेट्टी, दत्तात्रय भाकरे, राजेंद्र चव्हाण आणि दिनेश भंडारी यांना कोर्टानं 10 वर्षांची शिक्षा सुनावली आहे.
छोटा राजन टोळीचा गुंड फरीद तनाशाच्या मारेकऱ्यांना जन्मठेप
अमेय राणे, एबीपी माझा, मुंबई
Updated at:
30 May 2018 06:31 PM (IST)
अंडरवर्ल्ड डॉन छोटा राजनचा हस्तक फरीद तनाशा याच्या हत्येचा आरोप असलेल्या 11 जणांना मुंबईतील विशेष मोक्का कोर्टानं दोषी ठरवलं आहे.
- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -