मुंबई : कोकण पदवीधर मतदारसंघाची निवडणूक प्रतिष्ठेची होण्याची चिन्हं आहेत. राष्ट्रवादीला सोडचिठ्ठी देऊन भाजपचा झेंडा खांद्यावर घेतलेल्या निरंजन डावखरेंसमोर राष्ट्रवादी उमेदवार देण्याच्या तयारीत आहे.


भाजपकडून कोकण पदवीधर मतदारसंघाची उमेदवारी निरंजन डावखरे यांना मिळणार आहे. तर निरंजन डावखरेंच्या विरोधात राष्ट्रवादी काँग्रेस ही जितेंद्र आव्हाड यांचे कट्टर समर्थक असलेल्या नजिब मुल्ला यांना उमेदवारी देण्याची शक्यता आहे.
निरंजन डावखरेंच्या भाजपप्रवेशाची 'इन्साईड स्टोरी'

नजीब मुल्ला यांची उमेदवारी निश्चित मानली जात असून केवळ अधिकृत घोषणेची औपचारिकता बाकी आहे. त्यामुळे एकाच पक्षात असताना डावखरे आणि आव्हाड यांच्यात रंगलेल्या संघर्षाचा दुसरा अंक पुन्हा सुरु होण्याची चिन्हं आहेत.

पक्षांतर्गत राजकारणाला कंटाळून निरंजन डावखरेंनी राष्ट्रवादीला रामराम ठोकला. स्थानिक राजकारणात जितेंद्र आव्हाडांमुळे डावखरे पिता पुत्र नाराज होते. 6 जून 2016 रोजी विधानपरिषद निवडणुकीत वसंत डावखरे पडले. या निवडणुकीत स्थानिक पातळीवर राष्ट्रवादी पक्षाने मदत न केल्यामुळे वसंत डावखरे बिथरले होते.

अनेकवेळा पक्षाध्यक्ष शरद पवार, अजित पवार यांच्याकडे तक्रारी केल्या होत्या. पवारांनी फोन करुन कान टोचल्यावर गोष्टी तात्पुरत्या शांत होत होत्या. पण नंतर पुन्हा तेच राजकारण सुरु व्हायचं.

पदवीधर निवडणुकांसाठी 25 जूनला मतदान होणार आहे, तर 28 जूनला मतमोजणी होणार आहे.
राष्ट्रवादीला धक्का, निरंजन डावखरे भाजपत!

विशेष म्हणजे, भाजपविरोधात शिवसेनाही उमेदवार देण्याच्या तयारीत आहे, मात्र त्याबाबत अद्याप अधिकृत घोषणा झालेली नाही.