मुंबई : भाजप आमदार आशिष शेलार (Ashish Shelar) आणि मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर (Mumbai Mayor Kishori Pednekar) यांच्यातील वादानंतर आता महापौरांना धमकीचे पत्र आलं आहे. मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांना जीवे मारण्याची धमकी पत्राद्वारे दिली आहे.  पत्रात अश्लिल भाषेचा वापर करत महापौरांना शिविगाळ देखील करण्यात आली आहे. याबाबत  महापौर पोलिसांत तक्रार देणार असून भायखळा पोलीस स्टेशनचे पोलीस अधिकारी महापौर बंगल्यावर पोहोचले असल्याची देखील माहिती आहे. 


या पत्रात महापौरांच्या कुटुंबियांनाही गोळ्या घालून मारण्याची धमकी देण्यात आली आहे. माझ्या दादाकडे बघशील तर परिणाम वाईट होतील असे सांगून अश्लिल भाषेत धमकी देणारे हे पत्र महापौर निवासस्थानाच्या पत्त्यावर आले आहे.  गेल्यावर्षीही महापौरांना फोनद्वारे आली होती जीवे मारण्याची धमकी मिळाली होती.  महापौर झाल्यापासून किशोरी पेडणेकरांना दुसऱ्यांदा धमकी देण्यात आली आहे.   आशिष शेलार आणि किशोरी पेडणेकर यांच्यातील वादाच्या पार्श्वभूमीवर धमकीचं पत्र मिळाल्यानं खळबळ उडाली आहे. पत्रात अश्लिल भाषेचा वापर करण्यात आला आहे.  


महापौर किशोरी पेडणेकर यांनी दिलेल्या माहितीप्रमाणे हे पत्र अत्यंत अश्लिल भाषेत आहे, स्त्रीच्या प्रत्येक अंगाचा यात उल्लेख आहे. घरच्यांना, मुलांना मारुन टाकू, अशी भाषा पत्रात वापरण्यात आली आहे. पत्रामध्ये आत वेगळं नाव  आणि पत्ता आहे. बाहेर पाकीटावर वेगळं नाव आणि पत्ता आहे. हे पत्र पनवेलहून पोस्ट करण्यात आलं आहे असं किशोरी पेडणेकर यांनी सांगितलं आहे. मी यासंदर्भात पोलिसात तक्रार देणार आहे. आमचा आवाज दाबण्याचा प्रयत्न करत असेल, मी शिवसेनेची कार्यकर्ती असून धमकावून घरी बसवण्याचा प्रयत्न करत असेल तर त्याची दखल घेतलीच पाहिजे, असेही महापौर म्हणाल्या आहेत. आशिष शेलार यांच्यासंदर्भातील वाद वेगळा आहे, असं किशोरी पेडणेकर म्हणाल्या.


माझ्या दादाकडे वाकड्या नजरेनं पाहू नका
काल संध्याकाळी महापौर बंगल्यावर पत्र दाखल झालेलं आहे. या पत्रात सरळ सरळ धमकी देण्यात आली आहे. महापौर आणि  सगळ्या कुटुंबाला संपवण्याची धमकी देण्यात आली आहे. माझ्या दादाकडे वाकड्या नजरेनं बघू नका, असा इशारा पत्रात देण्यात आला आहे. हे पत्र पनवेलमधून कुरिअरद्वारे आलेलं आहे.  


किशोरी पेडणेकर यांना दुसऱ्यांदा ही धमकी देण्यात आली आहे. यापूर्वी फोन कॉलवरुन त्यांना धमकी देण्यात आली होती. महापौर किशोरी पेडणेकर स्वत: पोलीस स्टेशनला तक्रार दाखल करणार आहेत.  पत्रात नाव वेगवेगळी असल्यानं हे पत्र कुणी पाठवलं आहे याचा तपास होण्याची शक्यता आहे.