मुंबई : मुंबईतील दादरच्या इंदू मिल परिसरातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर राष्ट्रीय स्मारकाच्या पुतळ्याचा पायाभरणी सोहळा पुढे ढकलण्यात आला आहे. निमंत्रणावरुन नाराजी, प्रमुख नेत्यांची अनुपस्थिती यामुळे पायाभरणीचा आजचा नियोजित कार्यक्रम रद्द करण्यात आला आहे. परंतु या पायाभरणी सोहळ्याची पुढची तारीख अद्याप निश्चित करण्यात आलेली नाही.


मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते आज दुपारी साडेतीन वाजता बाबासाहेबांच्या पुतळ्याच्या पायाभरणीचा कार्यक्रम पार पडणार होता. परंतु या कार्यक्रमाच्या निमंत्रणावरुन नाराजीचे सूर उमटले. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर या कार्यक्रमाला फक्त 16 जणांना निमंत्रण देण्यात आलं होतं. बाबासाहेबांचे पणतू आनंदराज आंबेडकर आणि प्रकाश आंबेडकर, दोन्ही सभागृहाचे विरोधी पक्षनेते, आंबेडकरी चळवळीचे नेते यांची नावं आमंत्रितांमध्ये नव्हती. शिवाय मंत्रिमंडळातील अनेकांना आजच्या कार्यक्रमाची माहिती नव्हती. यानंतर अखेरच्या क्षणी इंदू मिल आंदोलनाचे प्रणेते आनंदराज आंबेडकर यांना निमंत्रण देण्यात आलं.


परंतु निमंत्रणावरुन सुरु झालेली नाराजी, प्रमुख नेत्यांची अनुपस्थिती यामुळे आजचा कार्यक्रम रद्द करण्याची वेळ आली. सर्वांना सोबत घेऊन, सगळ्यांच्या उपस्थितीत हा ऐतिहासिक कार्यक्रमा पाड पडावा यासाठीच आजचा कार्यक्रम पुढे ढकलण्यात आला आहे. लवकरच या कार्यक्रमाची रुपरेषा आणि पुढची तारीख जाहीर होईल.


इंदू मिल आंबेडकर स्मारक : बाबासाहेबांच्या पुतळ्याची पायाभरणी, अखेरच्या क्षणी आनंदराज आंबेडकरांना निमंत्रण






इंदू मिलमधील डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारकाची उंची 100 फुटांनी वाढणार

कोणकोणत्या नेत्यांना निमंत्रण होतं?
या कार्यक्रमाला मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार, सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे, अन्न पुरवठा मंत्री छगन भुजबळ, महसून मंत्री बाळासाहेब थोरात, शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड, ऊर्जा मंत्री नितीन राऊत, पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे, मुंबईचे पालकमंत्री अस्लम शेख, मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर, स्थानिक आमदार सदा सरवणकर, नगरसेवक आणि अधिकारी यांनाच निमंत्रण देण्यात आलं होतं. परंतु अखेरच्या क्षणी आनंदराज आंबेडकर यांना निमंत्रण देण्यात आलं.



कार्यक्रम पुढे ढकलला हे चांगलंच झालं : आनंदराज आंबेडकर
कार्यक्रम पुढे ढकलला हे चांगलच झालंच, अशी प्रतिक्रिया रिपब्लिकन सेनेचे प्रमुख आनंदराज आंबेडकर यांनी एबीपी माझाशी बोलताना दिली. राज्यात सध्या जे वातावरण आहे, ते पाहता असे सोहळे करणं योग्य नाही. दोन्ही समाजांमध्ये वाद नको अशी माझी मानसिकता होती. एमएमआरडीएला उशिरा सुचलेलं शहाणपण असं याचं वर्णन करता येईल, असं आनंदराज आंबेडकर म्हणाले.


इंदू मिलच्या जागेवर स्मारकाऐवजी लोकपयोगी वास्तू उभी करा, असं मत वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी व्यक्त केलं. याविषयी आनंदराज आंबेडकर म्हणाले की, "बाबासाहेब आंबेडकर यांचं आंतरराष्ट्रीय दर्जाचं स्मारक झालंच पाहिजे, अशी आमची मागणी आहे."


संबंधित बातम्या


भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचं स्मारक अडचणीत, लंडनच्या क्वीन कौन्सिलचा आक्षेप


14 एप्रिल 2022 पर्यंत डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या स्मारकाचं काम पूर्ण करणार : अजित पवार