मुंबई : मुंबईतील दादरच्या इंदू मिल परिसरातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर राष्ट्रीय स्मारकाच्या पुतळ्याची पायाभरणी आज होणार आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते बाबासाहेबांच्या पुतळ्याची पायाभरणी होईल. या कार्यक्रमाच्या निमंत्रणावरुन नाराजीचे सूर उमटत आहेत. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर या कार्यक्रमाला फक्त 16 जणांना निमंत्रण देण्यात आलं होतं. निमंत्रण नसल्याने बाबासाहेबांचे पणतू आनंदराज आंबेडकर आणि प्रकाश आंबेडकर नाराज असल्याचं म्हटलं जात होतं. मात्र अखेरच्या क्षणी इंदू मिल आंदोलनाचे प्रणेते आनंदराज आंबेडकर यांना निमंत्रण देण्यात आल्याचं कळतं.


आज दुपारी साडेतीन वाजता पायाभरणीचा कार्यक्रम पार पडणार आहे. सुरुवातीला या कार्यक्रमाला मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार, सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे, अन्न पुरवठा मंत्री छगन भुजबळ, महसून मंत्री बाळासाहेब थोरात, शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड, ऊर्जा मंत्री नितीन राऊत, पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे, मुंबईचे पालकमंत्री अस्लम शेख, मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर, स्थानिक आमदार, नगरसेवक आणि अधिकारी यांनाच निमंत्रण देण्यात आलं होतं. आंबेडकरी चळवळीतील कोणालाही आमंत्रित करण्यात आलेलं नाही तसेच इतर मंत्र्यांनाही याची माहिती दिली नसल्याने त्यांच्यात नाराजीचा सूर होता. परंतु अखेरच्या क्षणी आनंदराज आंबेडकर यांना निमंत्रण देण्यात आलं. परंतु वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांना अद्याप निमंत्रण दिलेलं नाही.


वृत्तवाहिन्या, सोशल मीडियात वातवरण तयार झाल्याने निमंत्रण : आनंदराज आंबेडकर
पायाभरणीच्या आमंत्रणाबाबत आनंदराज आंबेडकर म्हणाले की, "मला निमंत्रण आलं नव्हतं. वृत्तवाहिन्या आणि सोशल मीडिया वातावरण तयार झालं. त्यानंतर एमएमआरडीएने पत्र पाठवून कार्यक्रमाला उपस्थित राहण्यासाठी निमंत्रण दिलं. एमएमआरडीएच्या कामावर प्रश्न उपस्थित केल्याने ते आमच्याकडे दुर्लक्ष करत आहेत. संपूर्ण कामाच्या दर्जासाठी एक समिती बनवावी, अशी माझी विनंती आहे. स्मारक तयार झाल्यावर लाखो लोक येणार आहेत. समुद्राच्या जवळ असल्यामुळे दर्जा न राखल्यास अपघात झाला तर त्याची जबाबदारी सरकारची असणार आहे.


तर हा कार्यक्रम एवढ्या घाईने उरकरण्याची गरज काय होती, असा प्रश्नही आनंदराज आंबेडकर यांनी विचारला आहे. "राज्यात आधीच कोरोना, मराठा आरक्षण यांसारखे प्रश्न असताना हा कार्यक्रम एवढ्या घाईघाईने उरकण्याची गरज काय होती. महाराष्ट्रातील वातावरण आधीच तापलेलं आहे अशा वेळी हा कार्यक्रमासाठी घाई करण्याची गरज नव्हती, असं ते म्हणाले.


इंदू मिलमधील डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारकाची उंची 100 फुटांनी वाढणार


प्रकाश आंबेडकर काय म्हणाले?
वंचित बहुजन आघाडीचे नेते आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे पणतू प्रकाश आंबेडकर यांनाही या कार्यक्रमासाठी निमंत्रण मिळालेलं नाही. याविषयी ते म्हणाले की, "निमंत्रण कोणाला द्यायचं, कोणाला नाही हा मुख्यमंत्र्यांचा निर्णय आहे. राज्य सरकार तीन पक्षांचं आहे. या सकारमधील इतर दोन पक्षांशी माझं सख्य नाही. मुख्यमंत्री स्वतंत्रपणे निर्णय घेऊ शकतात का? त्यामुळे याबाबत माझं काहीच म्हणणं नाही."


इंदू मिलमधील स्मारक कसं असेल?
मुंबईतील दादर येथील इंदू मिल परिसरात 125 एकर जागेवर भारतरत्न बाबासाहेब आंबेडकरांचे स्मारक उभारण्यात येणार आहे. 2011 मध्ये काँग्रेस-राष्ट्रवादी सरकारने आंबेडकर स्मारकासाठी इंदू मिलची जागा देण्याची घोषणा केली. त्यानंतर युतीच्या सरकरने केंद्रीय वस्त्रोद्योग मंत्रालायकडून सर्व परवानग्या मिळवल्या. बिहार निवडणुकीआधी ऑक्टोबर 2015 साली पंतप्रधान मोदींच्या हस्ते इंदू मिल इथे आंबेडकरांच्या स्मारकाचे भूमिपूजन करण्यात आलं होतं. या स्मारकाच्या आराखड्यात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा पूर्णाकृती पुतळा असेल. तसंच लायब्ररी, डॉ. आंबेडकरांनी लिहिलेली पुस्तके व ग्रंथ, भिक्खू निवासस्थान, विपश्यना सभागृह, पार्किंग, म्युझियम आदींचा या आराखड्यात समावेश आहे.


विरोधी पक्षनेत्यांनाही निमंत्रण नाही
पायाभरणी कार्यक्रमाचं आमंत्रण दोन सभागृहाच्या विरोधी पक्षनेत्यांनाही देण्यात आलेलं नाही. "महाविकास आघाडीत श्रेयवादाची लढाई सुरु आहे. हे सरकार अहंकाराने भरलेलं आहे," अशी टीका विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी केली आहे.


संबंधित बातम्या


भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचं स्मारक अडचणीत, लंडनच्या क्वीन कौन्सिलचा आक्षेप


14 एप्रिल 2022 पर्यंत डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या स्मारकाचं काम पूर्ण करणार : अजित पवार