क्वीन कौन्सिल यांनी उपस्थित केलेल्या आक्षेपांनुसार त्यांच्यासमोर महाराष्ट्र शासनाची बाजू मांडण्यासाठी सिंघानिया अॅंड को. सॉलिसिटर्स यांची नेमणूक करण्यात आली आहे.
भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे शिक्षण घेत असताना 1921-22 या काळात लंडन शहरातील 10 किंग हेन्री रोड, एनडब्लू तीन येथे वास्तव्यास होते. ही वास्तू लंडनमधील भारतीय उच्चायुक्तांच्या माध्यमातून महाराष्ट्र शासनाने विकत घेतली आहे. त्यांच्यामार्फतच या ठिकाणी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे स्मारक आणि वास्तूच्या नूतनीकरणाचे काम सुरू आहे. तिथल्या स्थानिक स्वराज्य संस्थेने (Queen Council) या निवासस्थानाचे स्मारकात रूपांतर करण्याबाबत आक्षेप घेतला आहे.
क्वीन कौन्सिलने उपस्थित केलेल्या आक्षेपाच्या अनुषंगाने असे स्पष्ट करण्यात येते की, महाराष्ट्र शासनाने ज्यावेळी ही वास्तू विकत घेतली त्यावेळी ती अत्यंत जीर्ण अवस्थेत होती. त्यामुळे सुरक्षेच्या दृष्टिकोनातून तिचे तातडीने नूतनीकरण करणे आवश्यक भासल्याने याबाबतची कार्यवाही महाराष्ट्र शासनाच्या वतीने लंडनमधील भारतीय उच्चायुक्तांनी केली आहे आणि हे काम निवासी म्हणून करण्यात आले आहे. लंडन येथील क्वीन कौन्सिलकडे आवश्यक प्रक्रिया पूर्ण केली जात असल्याचे राज्य सरकारने म्हटले आहे.
क्वीन कौन्सिल यांनी उपस्थित केलेल्या आक्षेपांनुसार त्यांच्यासमोर महाराष्ट्र शासनाची बाजू मांडण्यासाठी सिंघानिया अॅंड को. सॉलिसिटर्स यांची नेमणूक करण्यात आली आहे. यासंदर्भात क्वीन कौन्सिलपुढे महाराष्ट्र शासनाची बाजू मांडण्यासाठी स्थापन केलेल्या समितीमध्ये तज्ज्ञ Steven Gasztowicz QC आणि प्लॅनिंग तज्ज्ञ Mr. Charles Rose यांचा समावेश करण्यात आला आहे. याबाबत सप्टेंबरमध्ये सुनावणी होणार असून त्यास महाराष्ट्र शासनाचे प्रतिनिधी उपस्थित राहणार आहेत. याबाबत महाराष्ट्र शासन अतिशय गांभीर्याने संपूर्ण परिस्थितीवर लक्ष ठेवून असून संबंधित स्थानिक संस्थेने उपस्थित केलेल्या आक्षेपांचे निराकरण करून हे स्मारक पूर्ण करण्यासाठी सर्व पातळ्यांवर प्रयत्न केले जातील. त्यासाठी आवश्यक असणारी प्रशासकीय पातळीवरील संपूर्ण कार्यवाही प्राधान्याने पार पाडली जात असल्याचे राज्य सरकारने सांगितले आहे.
आठवले नरेंद्र मोदींना भेटणार
दरम्यान, केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी लंडनमधील डॉ बाबासाहेब आंबेडकर स्मारकाचा संग्रहालय दर्जा रद्द होऊ देणार नाही त्यासाठी त्वरित परराष्ट्र मंत्रालय आणि लंडन मधील भारतीय उच्चायुक्तालयाशी आपण संपर्क साधत आहोत. महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकरांचा ज्ञानसूर्य म्हणून अवघे विश्व सन्मान करीत असून लंडनमधील पालिकेचा हा निर्णय ब्रिटन सरकार ने रद्द करावा यासाठी भारत सरकार प्रयत्न करीत असल्याचे असल्याचे सांगितले आहे. ब्रिटन आणि भारत दोन्ही सरकारमध्ये चांगले संबंध असून स्मारकाचा संग्रहालय दर्जा रद्द होऊ नये म्हणून आपण सर्व स्तरावर प्रयत्न करीत असून वेळ पडल्यास प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांची याप्रकरणी भेट घेऊन प्रश्न मार्गी लावण्यात येईल असे आठवले यांनी म्हटले आहे.