मुंबई : मुंबईतील दादर परिसरातील इंदू मिलमधल्या प्रस्तावित डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारकाची उंची वाढवण्यात येणार आहे. यापूर्वी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याची उंची 250 फूट निश्चित करण्यात आली होती. आता ती वाढवून साडे 300 फूट होणार आहे. ठाकरे सरकारने याबाबत नवा प्रस्ताव आणला आहे. आज कॅबिनेट बैठकीत याबाबत चर्चा होणार आहे. दरम्यान, उंची वाढवल्यामुळे पुतळ्याचा खर्च देखील वाढणार आहे. परिणामी 709 कोटींचा खर्च आता 990 कोटींवर जाणार आहे. या स्मारकाचा पाया 100 फुटांचा असेल. 14 एप्रिल 2020 पर्यंत स्मारकाचे काम पूर्ण होणार असल्याचा दावा उपमुख्यमंत्र्यांनी केला असला तरी स्मारकाची एक वीटही अद्याप रचली गेलेली नाही.


14 एप्रिल 2020 पर्यंत स्मारकाचं काम पूर्ण करणार
इंदू मिल येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या स्मारकाचं काम 14 एप्रिल 2020 पर्यंत पूर्ण करणार असल्याचं उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी काही दिवसांपूर्वी सांगितलं होतं. 2 जानेवारी रोजी अजित पवारांनी इंदू मिलमधील बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मारकाच्या कामाची पाहणी केली. त्यानंतर झालेल्या पत्रकार परिषदेत स्मारकाबाबत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याशी चर्चा करुन या महिन्यात सर्व परवानग्या मिळवून देणार असल्याचं सांगितलं. तसंच सर्व अडचणी दूर करुन स्मारकासाठी निधी उपलब्ध करुन देण्यात येईल, असंही म्हणाले.


इंदू मिलमधील स्मारक कसं असेल?
मुंबईतील दादर येथील इंदू मिल परिसरात 125 एकर जागेवर भारतरत्न बाबासाहेब आंबेडकरांचे स्मारक उभारण्यात येणार आहे. 2011 मध्ये काँग्रेस-राष्ट्रवादी सरकारने आंबेडकर स्मारकासाठी इंदू मिलची जागा देण्याची घोषणा केली. त्यानंतर युतीच्या सरकरने केंद्रीय वस्त्रोद्योग मंत्रालायकडून सर्व परवानग्या मिळवल्या. बिहार निवडणुकीआधी ऑक्टोबर 2015 साली पंतप्रधान मोदींच्या हस्ते इंदू मिल इथे आंबेडकरांच्या स्मारकाचे भूमिपूजन करण्यात आलं होतं. या स्मारकाच्या आराखड्यात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा पूर्णाकृती पुतळा असेल. तसंच लायब्ररी, डॉ. आंबेडकरांनी लिहिलेली पुस्तके व ग्रंथ, भिक्खू निवासस्थान, विपश्यना सभागृह, पार्किंग, म्युझियम आदींचा या आराखड्यात समावेश आहे.


संबंधित बातम्या


भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचं स्मारक अडचणीत, लंडनच्या क्वीन कौन्सिलचा आक्षेप


14 एप्रिल 2022 पर्यंत डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या स्मारकाचं काम पूर्ण करणार : अजित पवार