मुंबई : सामाजिक न्यायमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते धनंजय मुंडे यांना मोठा दिलासा मिळाला आहे. कारण धनंजय मुंडे यांच्याविरोधातील बलात्काराची तक्रार मागे घेण्यात आली आहे. कौटुंबिक कारणं आणि या प्रकरणाचं राजकारण होत असल्याने तक्रार मागे घेत असल्याचं ट्वीट रेणू शर्मा या महिलेने केलं आहे.
काही दिवसांपूर्वी धनंजय मुंडे यांच्यावर रेणू शर्मा हिने यांनी बलात्काराचा गंभीर आरोप केला होता. रेणू शर्मा यांनी मुंडे यांच्याविरुद्ध ओशिवारा पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली होती. यानंतर धनंजय मुंडे यांनी फेसबुक पोस्ट लिहीत यावर स्पष्टीकरण दिलं होतं. आपले करुणा शर्मा नावाच्या महिलेसोबत संबंध होते आणि या संबंधातून दोन मुले असल्याचा खुलासा त्यांनी केला होता. दरम्यान, यावर आता रेणू शर्मा यांनी ट्वीट करत तक्रार मागे घेण्याचं कारण सांगितलं आहे.
रेणू शर्मा यांचे ट्विट..
मी धनंजय मुंडे यांच्यावर लग्नाचे वचन आणि बलात्काराचा आरोप केला होता, या संदर्भात माझे हे निवेदन आहे. मला हे स्पष्ट करायचे आहे, की माझी बहीण आणि धनंजय मुंडे यांच्यात काही काळापासून तणाव निर्माण झाला असून कोर्टात खटला सुरू झाल्याने मी मानसिक तणावाखाली होते. मात्र, विरोधी पक्ष त्यांच्याविरूद्ध (मुंडे) जाताना पाहून मला वाटले की मी मोठ्या राजकीय षडयंत्राचा बळी होत आहे. काही लोक माझ्या खांद्यावर बंदुका ठेऊन चालवत आहेत आणि हे सर्व चुकीचे आहे.
मला माझ्या कुटुंबातील कोणत्याही व्यक्तीचे नाव वाईट नात्यांपासून दूर ठेवण्यासाठी हे करायचे नव्हते. शेवटी मला एवढेच सांगायचे आहे, की धनंजय मुंडे यांच्याविरूद्ध दाखल केलेली तक्रार मी पूर्णपणे मागे घेत आहे. मला त्याच्याविरुध्द अशी कोणतीही तक्रार द्यायची नाही, कारण मला हे स्पष्ट करावेसे वाटते की मला लग्न आणि बलात्काराच्या आश्वासनाचा भंग करण्याची कोणतीही तक्रार नाही किंवा कोणताही अनुचित फोटो आणि व्हिडिओ नाही. हे विधान मी संपूर्ण जाणीवपूर्वक देत आहे.
मुंडेंवरील आरोपामुळे त्यांच्यासह कुटुंबाची, पक्षाची बदनामी झाली, खोटे आरोप करणं क्लेशदायक -अजित पवार