Lalbaugcha Raja Ganeshotsav Mandal : मुंबई : नवसाला पावणारा अशी ख्याती असलेला आणि जगभरात प्रसिद्ध असलेल्या ‘लालबागच्या राजाच्या चरणी नतमस्तक होण्यासाठी भाविक दरवर्षीच मोठी गर्दी करतात. अनेक सेलिब्रिटी देखील लालबाग राजाच्या चरणी लीन होण्यासाठी हजेरी लावतात. लालबाग राजाच्या चरणी नतमस्तक होण्यासाठी देश-विदेशातील व्हीव्हीआयपी देखील उपस्थित राहतात. अशातच देशासह जगभरातील श्रीमंतांच्या यादीत मोठ्या दिमाखात स्थान मिळवणारं अंबानी कुटुंब देखील दरवर्षी लालबाग राजाच्या दर्शनासाठी आवर्जुन उपस्थिती लावतं. अशातच यंदाच्या वर्षी अंबानी कुटुंबातील एका सदस्याची लालबागचा राजा सार्वजनिक गणेशोत्सव मंडळातील (Lalbaugcha Raja Sarvajanik Ganeshotsav Mandal) एका मानाच्या पदी नियुक्ती करण्यात आली आहे. 


लालबागचा राजा सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाच्या कार्यकारी (Executive) मंडळात रिलायन्स समुहाचे सर्वेसर्वा मुकेश अंबानी यांचे धाकटे चिरंजीव अनंत अंबानी (Anant Ambani) यांची मानद सदस्य म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. साधारणतः महिन्याभरापूर्वी झालेल्या वार्षिक सर्वसाधारण सभेत मंडळाच्या पदाधिकाऱ्यांनी एकमतानं हा निर्णय घेतल्याची माहिती मिळत आहे. अंबानी कुटुंबाच्या धार्मिक आणि सांस्कृतिक क्षेत्रातील योगदानाची दखल घेत मंडळानं हा निर्णय घेतल्याची माहिती मिळत आहे. 


अंबानी कुटुंब दरवर्षी लालबाग राजाच्या चरणी लीन होण्यासाठी आवर्जुन हजेरी लावतं. लालबाग राजा मंडळाला दरवर्षी अंबानींकडून मोठी देणगी देखील दिली जाते. याच पार्श्वभूमीवर अनंत अंबानींचा थेट कार्यकारी मंडळात समावेश केल्यामुळे लालबागचा राजा सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाच्या भूमिकेची विशेष चर्चा होत आहे. 


देश-विदेशात ख्याती असलेल्या लालबाग राजाच्या चरणी लीन होण्यासाठी अनेकजण आवर्जुन उपस्थित राहतात. गेल्या काही वर्षांत लालबागच्या राजाच्या प्रसिद्धीत उल्लेखनिय भर पडली आहे. आणि परिणामी मंडळाची प्रतिष्ठा देखील वाढली आहे. अशा प्रतिष्ठित मंडळाच्या कार्यकारी मंडळात मानद सदस्य म्हणून निवड होणं, हे अत्यंत प्रतिष्ठेचं मानलं जातं. अनंत अंबानी यांच्या नियुक्तीमुळे मंडळाची प्रतिमा आणि प्रतिष्ठा आणखी वाढण्यास मदत होईल, असं बोललं जात आहे. 


अनंत अंबानी आता लालबाग राजा मंडळाचे मानद सदस्य


जगभरातील श्रीमंतांच्या यादीत समावेश होणारे मुकेश अंबानी यांच्या कुटुंबानं लालबागचा राजा गणेश मंडळाला पाठिंबा दिला आणि त्यासाठी त्यांनी रुग्ण सहाय्य निधी योजनेसाठी योगदान दिलं. त्याचप्रमाणे रिलायन्स फाउंडेशननं 24 डायलिसिस मशीन देखील लालबागचा राजा मंडळाला दिल्या आहेत. त्यामुळे वेळोवेळी मंडळाच्या कार्यात अंबानी कुटुंबीयांनी मोठा हातभार लावला आहे. अंबानी कुटुंबाच्या याच कामाची दखल म्हणून लालबागचा राजा सार्वजनिक गणेशोत्सव मंडळानं अनंत अंबानी यांची प्रमुख सल्लागार म्हणून कार्यकारी समितीत नेमणूक केली आहे.


अंबानींकडून दरवर्षी लालबाग राजाच्या चरणी कोट्यवधींचं दान 


लालबाग राजाच्या चरणी अंबानी कुटुंबियांकडून कोट्यवधींचं दान दिलं जातं. अशातच गेल्यावर्षी स्वतः अनंत अंबानी यांनी कोट्यवधी रुपयांचा निधी दान देखील केला होता. काही दिवसांपूर्वीच अनंत अंबानी यांनी आपल्या नव्या आयुष्याला सुरुवात केली आहे. अशातच लग्नानंतर अनंत अंबानी यांनी यावर्षीसुद्धा लालाबाग राजाला मोठी देणगी दिल्याचं बोललं जात आहे. लालबागचा राजा सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाला गणेशोत्सव काळात मिळालेल्या दानातून समाजकार्य केली जातात. मंडळामार्फत आजारी, गरजू व्यक्तींना मोठ्या प्रमाणात मदत देखील केली जाते.