मुंबई : राज्यातील एसटी कर्मचारी संपाच्या पार्श्वभूमीवर सह्याद्री अतिथीगृहावर मुख्यमंत्र्यांसोबत संघटनांची बैठक झाली. एसटी कर्मचारी कृती समिती संघटनेने बेमुदत संपाची हाक दिली होती, आज संपाचा दुसरा दिवस असून राज्यात प्रवाशांची मोठी गैरसोय झाल्याचं पाहायला मिळालं. विशेष म्हणजे राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांचा महाराष्ट्र दौरा असतानाच हा संप पुकारण्यात आल्याने प्रशासनाची मोठी धांदल उडाली होती. त्यातच, आज मुख्यमंत्र्यांसोबत झालेल्या बैठकीनंतर एसटी कर्मचारी संघटनांनी आपला संप मागे घेतला आहे. त्यामुळे,आजपासूनच गाड्या सुरू होणार असल्याचं मंत्री उदय सामंत यांनी म्हटलं. एसटी कर्मचाऱ्यांना पगारात साडे सहा हजारांची घसघशीत वाढ करण्यात आली. त्यामुळे, मुख्यमंत्र्यांसोबत झालेल्या बैठकीनंतर एसटी कर्मचाऱ्यांनी संप मागे घेत आनंद व्यक्त केला, कर्मचारी संघटनांच्या प्रतिनिधींनी सह्याद्री गेस्ट हाऊस बाहेर जल्लोष केला आहे.
सह्याद्रीवरील बैठकीनंतर मंत्री उदय सामंत (Uday Samant) बोलताना म्हणाले की, मी सर्वप्रथम मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे आभार मानतो. सरसकट मूळ वेतनात साडेसहा हजार रुपये वाढ करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. एसटी कर्मचारी (ST Strike) वेतन आणि महिलांच्या स्वच्छतागृहाचाही प्रश्न होता. एमआयडीसीच्या माध्यमातून 700 कोटी खर्च करुन, कंत्राटीकरणातून कामाला सुरुवात झाली आहे. या बैठकीकडे सर्वांचे लक्ष लागले होते, मुख्यमंत्री महोदयांनी 6.5 हजार रुपये पगारवाढीची मागणी मान्य केली आहे. माझी आपल्या सर्वांच्या माध्यमातून विनंती आहे, तातडीने हा संप कर्मचारी संघटना मागे घेतील. आजपासूनच गाड्या सुरू होतील, गणेशोत्सवाचा सण आहे, कोकणात जाणाऱ्यांसाठी महत्वाचं आहे. त्यामुळे, आजपासूनच गाड्या सुरू होतील, अशी माहिती मंत्री उदय सामंत यांनी दिली आहे.
काय म्हणाले संघटनेचे पदाधिकारी
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांचे आम्ही आभार मानतो.ज्या मागण्या मान्य करण्यासाठी आम्ही गेलो होतो, ते सढळहस्ते पहिल्यांदाच एसटी कर्मचाऱ्यांना मिळालं आहे. साडे सहा हजार रुपये पगारवाढ देण्याचा निर्णय झाला आहे. तसेच, गेल्या 6 महिन्यांपासून 2000 कर्मचारी घरी बसले आहेत. लहान-सहान केसेससाठी घरी असलेल्या कर्मचाऱ्यांना कामावर घेण्याचाही निर्णय आजच्या बैठकीत घेण्यात आला आहे. मला वाटतं हा आनंद जनतेसोबत कर्मचाऱ्यांनाही मोठा आहे. महाराष्ट्रात ही पहिली वेळ आहे, 23 संघटनांच्या कर्मचाऱ्यांची आज बैठक झाली. पुन्हा एकदा संघटनेतर्फे आम्ही राज्य सरकारचे आभार मानतो, असे संघटनेच्या पदाधिकारी यांनी म्हटलं आहे.
22 कोटींचा महसूल बुडाला
दरम्यान, आज दिवसभरात 11 कामगार संघटनांच्या कृती समितीने पुकारलेल्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर राज्यभरातील एसटीच्या 251 पैकी 94 आगार पुर्णतः बंद होते. 92 आगारांमध्ये अंशतः वाहतूक सुरू होती. तर 65 आगारामध्ये पुर्णतः वाहतूक सुरळीत सुरू होती. आज 40,069 नियोजित फेऱ्यांपैकी आंदोलनामुळे 27470 फेऱ्या रद्द झाल्या आहेत. दिवसभर सुमारे 70% वाहतूक बंद होती. त्यामुळे, आज दिवसभर सुमारे 22 कोटी रुपयांचा महसूल बुडाला असल्याची माहिती आहे.
हेही वाचा
ST Strike: मोठी बातमी ! एसटी कामगारांच्या पगारात साडे सहा हजारांची वाढ; अखेर संप मागे