मुंबई: कुर्ला परिसरात सोमवारी रात्री बेस्ट बसने काही गाड्या आणि लोकांना चिरडल्याची घटना घडली होती. या दुर्घटनेत एकूण 7 जणांचा मृत्यू झाला होता. या अपघातावेळी संजय मोरे हा बेस्टचालक वाहन चालवत होता. प्राथमिक तपासात संजय मोरे याने इलेक्ट्रिक बस अचानक अनियंत्रित झाल्याचे पोलिसांना सांगितले आहे. मी गेल्या 30 वर्षांपासून वाहन चालवत आहे. माझ्या नावावर आतापर्यंत एकाही अपघाताची नोंद नाही. बसमध्येच तांत्रिक बिघाड असल्याचे संजय मोरे याने चौकशीदरम्यान सांगितले होते. मात्र, आता याप्रकरणात एक वेगळीच माहिती समोर येत आहे. पोलिसांना हा अपघात नसून घातपाताचा प्रकार असल्याचा संशय वाटत आहे. संजय मोरे याने बसचा वापर एखाद्या शस्त्रासारखा केला का आणि जाणुनबुजून रस्त्यावरील गाड्या आणि लोकांना चिरडले का, या पैलूनेही या प्रकरणाचा तपास केला जात आहे. 


आयएनएस वृत्तसंस्थेच्या माहितीनुसार, कुर्ला येथील एलबीएस मार्गावर अपघातस्थळी असलेल्या प्रत्यक्षदर्शींनी, संजय मोरे हा गाड्या आणि लोकांना चिरडत असताना आनंदाने हसत होता. त्यामुळे पोलीस या प्रकरणात घातपाताचा अँगल तपासून पाहत आहेत. न्यायालयाने संजय मोरे याला 21 डिसेंबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. त्यामुळे पोलीस सध्या संजय मोरे याची कसून चौकशी करत आहेत. या चौकशीदरम्यान संजय मोरे अपघात नेमका कसा झाला, यावर नेमकेपणाने आणि स्पष्टपणे न बोलता बस अचानक अनियंत्रित झाल्याचे वारंवार सांगत आहे. संजय मोरे गेल्या 30 वर्षांपासून अवजड वाहने चालवत असेल तर 400 ते 450 मीटरपर्यंत इलेक्ट्रिक बस अनियंत्रितपणे कार आणि लोकांना चिरडत कशी गेली? संजय मोरे हा अनुभवी असूनही त्याला या सगळ्याचा अंदाज कसा आला नाही, याबाबत प्रश्न उपस्थित झाले आहेत. त्यामुळे पोलीस या प्रकरणातील सगळे पैलू तपासून पाहत आहेत. 


इलेक्ट्रिक बसची कार्यप्रणाली वेगळी असल्यामुळे अपघात?


आरटीओ आणि बेस्ट प्रशासनाकडून अपघातग्रस्त इलेक्ट्रिक बसची पाहणी करण्यात आली होती. त्यांच्या अहवालात काय निष्कर्ष समोर येतो, याकडे पोलिसांच्या नजरा लागल्या आहेत. बेस्ट प्रशासन आणि आरटीओने प्रथमदर्शनी बसमध्ये कोणताही तांत्रिक बिघाड नसल्याचे म्हटले आहे. संजय मोरे याने क्लच समजून अॅक्सिलेटरवर पाय दिल्याने अपघात झाल्याची एक शक्यता वर्तविण्यात येत आहे. संजय मोरे हा यापूर्वी बेस्टच्या ताफ्यातील मिनी बस चालवायचा. या मॅन्युअल बसेस आणि इलेक्ट्रिक बसेसच्या कार्यप्रणालीत फरक असतो. त्यामुळे चालकांना नवीन बस चालवण्याची सवय चालवायला काहीवेळ जातो. मात्र, संजय मोरे याने पोलिसांना दिलेल्या माहितीनुसार, त्याला केवळ दोन दिवस संगणकावर आणि एक दिवस इलेक्ट्रिक बस चालवण्याचे प्रशिक्षण देण्यात आले होते. त्यानंतर 1 डिसेंबरपासून कुर्ला आगारातील इलेक्ट्रिक बसचा चालक म्हणून त्याची नियुक्ती करण्यात आली होती. 



आणखी वाचा


Kurla BEST Bus Accident: 'हाथ मे गोल्ड है'; कुर्ला अपघातानंतर हेल्मेट घातलेल्या तरुणानं सर्वांसमोरच मृत महिलेच्या बांगड्या चोरल्या