नवी दिल्ली: गेल्या दीड वर्षांपासून महाराष्ट्राच्या राजकारणाच्या केंद्रस्थानी राहिलेल्या शरद पवार आणि अजित पवार हा काका-पुतण्यातील वाद अखेर संपण्याची चिन्हे दिसत आहेत. शरद पवार यांच्या 84व्या वाढदिवसानिमित्त अजित पवार हे गुरुवारी सकाळी सहकुटुंब पवारांच्या दिल्लीतील 6 जनपथ या निवासस्थानी पोहोचले आहेत. ते आता शरद पवार यांना भेटून वाढदिवसाच्या शुभेच्छा देतील. लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत एकमेकांविरोधात निकराची लढाई केल्यानंतर दिल्लीतील शरद पवार आणि अजित पवार यांची ही भेट महाराष्ट्राच्या राजकारणाच्यादृष्टीने अत्यंत महत्त्वाची मानली जात आहे. एकीकडे या भेटीमुळे पवार वाद संपल्याची चर्चा सुरु झाली असताना या भेटीचा आणखी एक अर्थ काढला जात आहे. 


अजित पवार यांनी शरद पवार यांची भेट घेऊन भाजप नेतृत्त्वाला एक संदेश देण्याचा प्रयत्न केला आहे का, अशी चर्चा आता रंगू लागली आहे. याविषयी बोलताना 'एबीपी माझा'च्या कार्यकारी संपादक सरिता कौशिक यांनी सांगितले की, लोकसभा निवडणुकीतील पराभवातून अजित पवार यांनी धडा घेतला होता. त्यामुळेच अजित पवार यांनी लोकसभेला आपण सुनेत्रा पवार यांना सुप्रिया सुळे यांच्याविरोधात उभे करुन चूक केल्याची कबुली दिली. त्यानंतर अजित पवार यांनी लोकसभा निवडणुकीप्रमाणे शरद पवार यांच्यावर वैयक्तिक टीका करणेही टाळले होते. त्यानंतर आता अजित पवार सगळे वाद विसरुन शरद पवार यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा द्यायला त्यांच्या दिल्लीतील निवासस्थानी गेले आहेत. गेल्या काही दिवसांपासून शरद पवार गटाचे खासदार हे अजितदादांच्या गटात प्रवेश करुन महायुतीसोबत जाणार, अशी चर्चा सुरु आहे. या पार्श्वभूमीवर अजित पवार आणि शरद पवार यांची ही भेट महत्त्वाची मानली जात आहे, असे सरिता कौशिक यांनी सांगितले.


माझ्यासाठी सर्व दरवाजे उघडे, अजित पवारांचा मेसेज?


अजित पवार हे महायुतीसोबत सत्तेत गेल्यानंतरही त्यांच्या गटाचे नेते शरद पवार यांच्याबद्दल कायमच आदराने बोलत आले आहेत. त्यानंतरची आजची दिल्लीतील भेट ही शरद पवार आणि अजित पवार यांचे राजकीय आणि कौटुंबिक संबंध चांगले होण्याची चाहुल मानली जात आहे. ही केवळ सदिच्छा भेटही असू शकते. मात्र, यामागे एक वेगळे कारणही असू शकते. अजित पवार यांची ही दुसरी दिल्लीवारी आहे. त्यावेळी त्यांना भाजपश्रेष्ठींची भेट हवी होती, पण अजित पवार यांना भाजपच्या कोणत्याही नेत्याची भेट मिळाली नव्हती. त्यामुळे अजित पवार आता भाजपला राजकीय मेसेज देण्यासाठी शरद पवारांच्या भेटीला आले असावेत. काल अजित पवार दिल्लीत पोहोचले आणि आज शरद पवार यांच्या भेटीला आले. 


या माध्यमातून अजित पवार हे माझ्यासाठी सर्व दरवाजे ओपन आहेत, असा मेसेज देण्याचा प्रयत्न करत असावेत. सध्या महाराष्ट्रात महायुतीच्या मंत्रिमंडळ आणि खातेवाटपाबाबत चर्चा सुरु आहे. माजी मुख्यमंत्री असलेल्या एकनाथ शिंदे यांच्या नाराजी सातत्याने चर्चा सुरु आहे. त्यांची नाराजी दूर करण्यासाठी भाजपचे नेते प्रयत्न करत आहेत. त्यामुळे एकनाथ शिंदे यांची प्रचंड चर्चा सुरु आहे. या सगळ्यात अजित पवार यांच्या राष्ट्रवादीला फारसे महत्त्व मिळताना दिसत नाही. या पार्श्वभूमीवर अजित पवार यांनी शरद पवार यांची भेट घेऊन भाजप नेतृत्त्वाला अप्रत्यक्षपणे आमच्यासमोर अनेक पर्याय आहेत, हे दाखवण्याचा प्रयत्न केला असू शकतो, असे मत सरिता कौशिक यांनी व्यक्त केले.


आणखी वाचा


मोठी बातमी: अपने तो अपने होते है! शरद पवारांना वाढदिवसाच्या शुभेच्छा द्यायला अजित पवार सहकुटुंब 6 जनपथवर पोहोचले