नवी दिल्ली: राज्यातील मंत्रिमंडळ विस्ताराबाबत महायुतीमध्ये कोणताही तिढा नाही. अमित शाह यांच्यासोबतच्या बैठकीत मंत्रिमंडळ विस्ताराबाबत चर्चा झाली आहे. लवकरच मंत्रिमंडळ विस्तार केला जाईल, असे वक्तव्य राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले. देवेंद्र फडणवीस यांनी गुरुवारी सकाळी दिल्लीतील 7 लोककल्याण मार्ग येथील निवासस्थानी जाऊन पंतप्रधान मोदी यांची भेट घेतली. यानंतर फडणवीसांनी महाराष्ट्र सदनात प्रसारमध्यमांशी संवाद साधताना महायुती सरकारच्या मंत्रिमंडळ विस्ताराबाबत भाष्य केले.
अजित पवार हे त्यांच्या कामासाठी दिल्लीत आले आहेत, तर मी माझ्या कामासाठी आलो आहे. आमच्या दोघांची कालपासून भेट झालेली नाही. एकनाथ शिंदे यांचे दिल्लीत कोणतेही काम नव्हते, त्यामुळे ते दिल्लीत आले नाहीत. महायुती सरकारमध्ये मंत्रिमंडळासंदर्भात कोणताही तिढा नाही. मी काल रात्री अमित शाह, बी.एन. संतोष आणि जे.पी. नड्डा यांच्याशी मंत्रिमंडळ विस्ताराबाबत चर्चा केली. अजित पवार, एकनाथ शिंदे आणि भाजपचे नेते मंत्रिमंडळात कोणाकोणाला संधी द्यायची, याचा निर्णय स्वतंत्रपणे घेतील. भाजपकडून मंत्रिपदासाठी प्रत्येक खात्यासाठी कोणता मंत्री असू शकतो, यासाठी काही नावं निवडण्यात आली आहेत. आता भाजपचे वरिष्ठ नेते त्याबाबत अंतिम निर्णय घेतील, असे देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले.
पंतप्रधान मोदींनी देवेंद्र फडणवीस यांना कोणता कानमंत्र दिला?
देवेंद्र फडणवीस यांनी पंतप्रधान मोदी यांच्या भेटीतील तपशीलही प्रसारमाध्यमांना सांगितला. आपण मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतो तेव्हा पंतप्रधान, राष्ट्रपती आणि उपराष्ट्रपतींची भेट घ्यायची असते, असा संकेत आहे. आज सकाळी पंतप्रधान मोदी यांच्यासोबत दीर्घ भेट झाली. मी त्यांचे आशीर्वाद घेऊन महाराष्ट्रासंदर्भात चर्चा केली. पंतप्रधान मोदी यांनी सांगितले की, महाराष्ट्र हे महत्त्वाचे राज्य आहे. येथील अर्थव्यवस्थेला कृतीची जोड देणे गरजेचे आहे. महाराष्ट्रासाठी मी पूर्ण सहकार्य द्यायला तयार असल्याचे पंतप्रधान मोदींनी सांगितल्याचे फडणवीस यांनी म्हटले.
पंतप्रधान मोदीजी आमच्यासाठी सर्वोच्च नेते आहेत, ते पितृतुल्य आहेत. आमचा सगळ्यांचा त्यांच्याशी स्पेशल कनेक्ट आहे. ते आमच्या प्रेमही करतात, चुकलो तर रागावतातही. ते आमच्या पालकाच्या भूमिकेत आहेत. त्यांना भेटणं ही नेहमीच आनंदाची गोष्ट आहे. मोदीजी नेहमी छत्रपती शिवाजी महाराजांच्या मार्गावर चालण्याचा प्रयत्न करतात. त्यामुळेच मी आज त्यांना छत्रपती शिवरायांची प्रतिमा भेट दिल्याचे देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले.
शरद पवार-अजित पवार भेटीबाबत फडणवीस म्हणाले....
आज सकाळी राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी शरद पवार यांची भेट घेऊन त्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या. या भेटीबाबत बोलताना देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले की, चांगली गोष्ट आहे. आमच्याकडूनही शरद पवार यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा आहेत. त्यांना दीर्घायु्ष्य आणि चांगले आरोग्य लाभो, ही आमची मनोकामना आहे, असे देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले. यावेळी त्यांनी परभणीतील हिंसाचाराबाबतही भाष्य केले. परभणीत माथेफिरू व्यक्तीने संविधानाची विटंबना केली, त्याचा आम्ही निषेध करतो. मात्र, या व्यक्तीला अटक झाल्यानंतरही इतक्या मोठ्याप्रमाणात हिंसा होणे योग्य नाही. संविधानाला मानणाऱ्यांनी त्याच मार्गाने निषेध केला पाहिजे, असे मत देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केले.
आणखी वाचा