मुंबई : भाजप नेते आणि माजी खासदार किरीट सोमय्या (Kirit Somaiya) यांचा कथित व्हिडीओ (Kirit Somaiya Video) पुन्हा चर्चेत आला आहे. कारण सोमय्यांकडे थोडी थोडकी नव्हे तर तब्बल 50 लाखांची खंडणी मागितल्याचा आरोप आहे. याप्रकरणी किरीट सोमय्या यांनी मुंबई पोलिसांकडे (Mumbai Police) तक्रार केली आहे. सोमय्यांच्या तक्रारीनंतर पोलिसांनी अज्ञात व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल केला आहे. आरोपीने सोमय्यांचा कथित व्हिडीओ व्हायरल करण्याची धमकी दिल्याचं तक्रारीत म्हटलं आहे.
किरीट सोमय्या यांच्या कार्यालयात एक मेल आला होता. त्यामध्ये अज्ञाताने सोमय्यांना त्यांचा कथित अश्लिल व्हिडीओ व्हायरल करण्याची धमकी दिली होती. 50 लाख रुपये द्या अन्यथा कथित अश्लील व्हिडिओ व्हायरल करेन, अशी धमकी सोमय्यांना मेलवरुन देण्यात आली.
नेमकं प्रकरण काय? (Kirit Somaiya viral video case)
काही दिवसांपूर्वी एक अश्लिल व्हिडीओ व्हायरल झाला होता. हा व्हिडीओ भाजप नेते किरीट सोमय्यांचा असल्याचा आरोप विरोधी पक्षनेते अंबादास दानवे (Ambadas Danve) यांनी केला होता. हाच कथित व्हिडीओ व्हायरल करण्याची धमकी, अज्ञात आरोपीने दिली. याप्रकरणी किरीट सोमय्यांनी पोलिसात धाव घेऊन तक्रार दाखल केली.
किरीट सोमय्या यांच्या तक्रारीवरून अज्ञात व्यक्तीविरुद्ध कलम 385 अन्वये नवघर पोलीस ठाण्यात (navghar police station) गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
व्हायरल व्हिडीओने राज्यभर खळबळ
जुलै महिन्यात व्हायरल झालेल्या व्हिडीओने महाराष्ट्रात खळबळ उडाली होती. अश्लिल व्हिडीओतील व्यक्ती किरीट सोमय्या असल्याचा आरोप झाला होता. एक दोन नव्हे तर तब्बल 36 क्लिप्स व्हायरल झाल्या होत्या. (Kirit Somaiya Viral Video) हा मुद्दा राज्याच्या विधिमंडळातही उपस्थित झाला होता. विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी विधानपरिषदेत थेट पेनड्राईव्ह आणला होता. किरीट सोमय्या यांच्याशी संबंधित 8 तासांचे व्हिडीओ या पेनड्राईव्हमध्ये असल्याचा दावा त्यावेळी अंबादास दानवे यांनी केला होता. तसंच सोमय्यांनी धमकी देऊन महिलांचं शोषण केल्याचा आरोप दानवेंनी केला होता.
सोमय्यांचं गृहमंत्र्यांना पत्र
दरम्यान या प्रकरणानंतर किरीट सोमय्या यांनी गृहमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांना पत्र लिहिलं होतं. या व्हायरल व्हिडीओ प्रकरणाची सत्यता तपासून,चौकशी करावी, अशी मागणी स्वत: किरीट सोमय्या यांनी केली होती.
फडणवीसांचं सभागृहात आश्वासन
दरम्यान, याप्रकरणाची सविस्तर चौकशी केली जाईल, असं आश्वासन, स्वत: गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिलं होतं. "हे प्रकरण गंभीर आहे. राजकारणात अनेक प्रसंग येतात. मला पुरावे द्या. आम्ही कोणालाही पाठिशी घालणार नाही. याप्रकरणाची सखोल चौकशी होईल. कोणतंही प्रकरण दाबलं जाणार नाही", अशी ग्वाही देवेंद्र फडणवीस यांनी सभागृहाला दिली होती.