Kirit Somaiya on Anil Parab Resort: राज्यात सत्तांतर झाल्यानंतर भाजपचे माजी खासदार किरीट सोमय्या (BJP Leader Kirit Somaiya) शिवसेनेच्या नेत्यांविरोधात अजून आक्रमक असल्याचे दिसत आहे. शिवसेनेचे नेते आणि माजी परिवहन मंत्री अनिल परब (Anil Parab) यांच्या दापोलीतील रिसॉर्टवर (Dapoli Resort) हातोडा पडणार असल्याचे सूचक ट्वीट किरीट सोमय्या यांनी केले आहे. रिसॉर्टच्या बांधकामाप्रकरणी पर्यावरण मंत्रालयाकडे पाठपुरवठा सुरू असल्याचे सोमय्या यांनी म्हटले आहे. 


राज्यात महाविकास आघाडीची सत्ता आल्यानंतर भाजपचे माजी खासदार किरीट सोमय्या यांनी तत्कालीन मंत्री आणि महत्त्वांच्या नेत्यांविरोधात आरोपांची राळ उडवून दिली होती. यामध्ये शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचे निकटवर्तीय समजले जाणारे अनिल परब यांचाही समावेश होता. दापोली येथील साई रिसॉर्ट हे अनिल परब यांच्या मालकीचे असून परब यांनी पर्यावरणाचे नियम धाब्यावर बसवून बांधकाम केले असल्याचा आरोप सोमय्यांनी केला होता. त्याशिवाय, हे रिसॉर्ट खरेदी करण्यासाठी गैरमार्गाने कमावलेला पैसा वापरला असल्याचा आरोप त्यांनी केला होता. 


किरीट सोमय्या यांनी आज सकाळी ट्वीट करून अनिल परब यांच्या दापोलीतील रिसॉर्ट प्रकरणात पर्यावरण मंत्रालयाकडे पाठपुरवठा सुरू असल्याचे सांगितले. येत्या दोन ते चार दिवसात रिसॉर्ट पाडण्याचा अंतिम आदेश अपेक्षित असल्याचे सोमय्यांनी सांगितले. 






दापोलीतील रिसॉर्ट प्रकरणात अनिल परब यांची ईडीने चौकशीदेखील केली होती. ईडीने परब यांच्या शासकीय आणि खासगी निवासस्थानीदेखील छापा मारला होता. त्यावेळी शिवसेनेने ही राजकीय सूडाने केलेली कारवाई असल्याचे म्हटले होते. 


साई रिसॉर्ट प्रकरणी आधी कोणते आदेश होते?


पर्यावरण मंत्रालय भारत सरकार यांनी 31 जानेवारी 2022 रोजी दापोली रत्नागिरी येथील साई रिसॉर्ट हे अनधिकृत असून तोडण्याचे आदेश दिले होते. 90 दिवसांमध्ये रिसॉर्ट मालक किंवा प्रशासनाने हे दोन्ही रिसॉर्ट तोडायचे होते. मात्र, 90 दिवस पूर्ण झाले असून अजूनही रिसॉर्ट पाडण्यात आले नाही. या रिसॉर्टच्या व्यवहार प्रकरणात मनी लाँड्रिंगचा आरोप करण्यात येत आहे. 


सोमय्यांनी कोणते आरोप केले होते?


अनिल परब यांनी लॉकडाऊन काळात शेतजमिनीवर रिसॉर्टचं बांधकाम करून फसवणूक केल्याचा आरोप किरीट सोमय्या यांनी केला होता. "अनिल परब यांच्यावर ताबडतोब फसवणूक करण्यासाठी मंत्रिपदाचा दुरुपयोग आणि लॉकडाऊनच्या नियमांना डावलून 2020 मध्ये तीनमजली रिसॉर्ट बांधल्याबद्दल गुन्हा दाखल करण्यात यावा अशी मागणी किरीट सोमय्यांनी केली होती. अनिल परब यांनी 19 जून 2019 रोजी पुण्यात राहणाऱ्या विवान साठे यांच्याकडून दापोली-मुरुड समुद्रकिनाऱ्यावर जागा घेतली होती. 1 कोटींमध्ये ही जागा घेतली. खरेदीखत शेतजमीन म्हणून झालं. सगळी कागदपत्रं शेतजमीन म्हणून असल्याचं त्यांनी सांगितलं होतं. पण सातच दिवसांत अनिल परब यांनी 26 जून 2019ला ग्रामपंचायतीला पत्र लिहिलं. जागा अकृषिक असल्याचा दाखला देखील जोडल्याचा दावा सोमय्यांनी केला होता. यावेळी आरोप करताना किरीट सोमय्यांनी संबंधित खरेदीखत आणि इतर कागदपत्र देखील पत्रकार परिषदेत दाखवली होती.


"7 मे 2021 रोजी तयार केलेल्या कागदपत्रांत ही जागा अजूनही शेतजमीन आहे. पण आज त्या जागेवर प्रत्यक्षात रिसॉर्ट आहे. कोणतीही परवानगी न घेता, सर्व नियमांची पायमल्ली करून लॉकडाऊनदरम्यान अनिल परब यांनी 10 महिन्यांत रिसॉर्टचं बांधकाम पूर्ण केलं. 10 मे रोजी मी स्वत: दापोलीला रिसॉर्टवर जाऊन हा घोटाळा उघड केला. 11 मे 2021ला अनिल परब यांनी बिनशेती जमिनीसाठीचा 1 एप्रिल 2017 ते 31 मार्च 2021 या काळासाठीचा 4 वर्षांचा टॅक्स तलाठीकडे भरला.", असा दावा किरीट सोमय्यांनी केला होता.


कच्च्या झोपडीसाठी दिलेल्या परवानगीची मुदत उलटून गेल्यानंतर तीन मजली रिसॉर्टचं बांधकाम केल्याचा आरोप सोमय्या यांनी परबांवर केला होता. “2015-16 मध्ये या जागेवर कच्ची झोपडी बांधण्याची परवानगी देण्यात आली होती. पण त्यात 12 महिन्यांत ते बांधकाम करण्यासंदर्भात नमूद करण्यात आलं होतं. पण त्यांनी ते केलं नाही. 2020 च्या सुरुवातीपर्यंत तिथं कोणतंही बांधकाम नव्हतं.