मुंबई : आंतरराष्ट्रीय स्तरावर दर्जेदार लॉजिस्टिक सेवा पुरवणाऱ्या केरी इंडेव्ह लॉजिस्टिकने भारतातील सेवा अधिक विस्तारित केली आहे. देशांतर्गत लॉजिस्टिकमध्ये सर्वसमावेशक व सर्वदूर सेवा देण्याच्या दृष्टीने केरीने मुंबईत नुकत्याच आठ नव्या लॉजिस्टिक सेवांचा शुभारंभ केला. भारतीय बाजारपेठेतील बी टू बी (बिझनेस टू बिझनेस) आणि बी टू सी (बिझनेस टू कन्झ्युमर) घटकांना या सेवांचा लाभ होणार आहे.
केरी इंडेव्ह एक्स्प्रेस या ब्रँडअंतर्गत या सेवा पुरवल्या जाणार आहेत. केरी इंडेव्ह ही जागतिक दर्जाची लॉजिस्टिक कंपनी असून या कंपनीला आयएसओ 9001-2015 हे मानांकन मिळाले आहे. भारतीय सीमाशुल्क खात्याने या कंपनीला ऑथोराइज्ड इकॉनॉमिक ऑपरेटरचा (एईओ) तसेच, ट्रान्सपोर्ट असेट्स प्रोटेक्शन (टीएपीए) आणि गुड डिस्ट्रिब्युशन प्रॅक्टिसचा (जीडीपी) दर्जा दिला आहे.
केरीचे अध्यक्ष डॉ. एस. झेव्हिअर ब्रिटो यांनी याबाबत सांगितले की, ‘’एक्स्प्रेस सेवेच्या माध्यमातून आमची कंपनी ग्राहकांना डोअर स्टेप सेवा देईल. आमच्या अमूल्य ग्राहकांना परिपूर्ण व डोअर स्टेप सेवा पुरवणे हे आमच्या कंपनीचे स्वप्न होते व या निमित्ताने ते पूर्ण होत आहे.’’
केरी इंडेव्ह एक्स्प्रेस ही प्रगत तंत्रज्ञानाच्या साह्याने स्वयंचलित व्यवसाय असणारी कंपनी असून ती ग्राहकांना डोअर स्टेप सेवा पुरवते. या वैशिष्ट्यांमुळे एकात्मिक लॉजिस्टिक सेवा देणारी ही भारतातील आघाडीची कंपनी ठरली आहे. या एक्स्प्रेस सेवेच्या पहिल्या टप्प्याचे संचालन २०० सेवा केंद्रांच्या माध्यमातून करण्यात येणार आहे. असंख्य वाहने व १,५०० कर्मचाऱ्यांना या सेवेत सामावून घेतले जाणार आहे. पार्सल लॉकरसारख्या तंत्रज्ञानावर आधारित डिलिव्हरी पर्यायांचाही या सेवेत समावेश असेल.
केरी इंडेव्ह लॉजिस्टिकच्या सेवा पुढीलप्रमाणे
सेम डे एक्स्प्रेस – एकाच शहरात अथवा जवळच्या शहरात सहा ते आठ तासांत निश्चित डिलिव्हरी करणारी सेवा.
अर्ली एक्स्प्रेस – विशिष्ट शहरांदरम्यान एका रात्रीत डिलिव्हरी करणारी सेवा.
प्रायॉरिटी पॅकेज एक्स्प्रेस – महत्त्वपूर्ण कागदपत्रे व अन्य पॅकेजेसची घरोघरी व दारोदारी डिलिव्हरी. ही सेवा २०० शहरांत उपलब्ध. तसेच, देशभरातील ३,००० पिनकोडचा या सेवेत समावेश. चालू वर्ष संपेपर्यंत ६,००० पिनकोडना सामावण्याचे उद्दिष्ट.
प्रायॉरिटी फ्रेट एक्स्प्रेस – महानगरे व निमशहरे येथे दारोदारी दुसऱ्या दिवशी डिलिव्हरी.
ई-कॉमर्स बिझनेस एक्स्प्रेस – ई-कॉमर्स व्यवसायातील वस्तूंची डिलिव्हरी. विदेशात जाणाऱ्या ई-कॉमर्स वस्तूंसाठी परवानगी मिळवणे. कॅश ऑन डिलिव्हरी, मालवाहू जहाजात डिलिव्हरी, रिव्हर्स लॉजिस्टिक सेवा.
याशिवाय, वेअरहाऊसिंग सोल्युशन एक्स्प्रेस आणि क्रिटिकल सोल्युशन्स एक्स्प्रेसद्वारे पासपोर्टसारखी महत्त्वाची कागदपत्रे, वैद्यकीय चाचण्यांचे नमुने, दागिने आदी मौल्यवान वस्तूंची डिलिव्हरी.
केरी इंडेव्ह लॉजिस्टिकच्या या सेवेचा ई-कॉमर्स व्यावसायिकांसह फार्मा, ऑटोमोबाइल, इंजिनीअरिंग आणि टेलिकॉम व्यवसायाला लाभ होईल. डॉ. एस. झेव्हिअर ब्रिटो यांनी तीन दशकांपूर्वी स्थापन केलेल्या इंडेव्ह लॉजिस्टिकतर्फे देशभरात लॉजिस्टिक सेवा पुरवण्यात येत आहे. ही सेवा अधिक प्रभावी व परिपूर्ण करण्यासाठी त्यांनी हाँगकाँग येथील केरी लॉजिस्टिकशी 2010 मध्ये संयुक्त उपक्रम करार केला आहे.
केरी लॉजिस्टिकचे मुख्यालय हाँगकाँग येथे असून चीन व आसियान क्षेत्रात थर्ड पार्टी लॉजिस्टिक सेवा प्रदान करणारी ती तिसऱ्या क्रमांकाची कंपनी आहे. सहा खंडांतील ५३ देशांमध्ये या कंपनीची साडेपाचशे कार्यालये आहेत. केरी लॉजिस्टिक नेटवर्कचा एक भाग असणाऱ्या केरी एक्स्प्रेसची थायलंड, कंबोडिया, व्हीएतनाम, हाँगकाँग, तैवान, मलेशिया, इंडोनेशिया या देशांत सेवा केंद्रे आहेत. या ठिकाणी दरमहा तब्बल दीड कोटी पार्सल बॉक्स हाताळले जातात.
केरी इंडेव्ह लॉजिस्टिकच्या एकात्मिक सेवेच्या माध्यमातून आंतरराष्ट्रीय लॉजिस्टिक सेवा, आंतरराष्ट्रीय डिलिव्हरीसाठीच्या परवानग्या मिळवणे, मालसाठा करणे आदी सुविधा उपलब्ध आहेत. विशेष म्हणजे, कंपनीच्या देशभरात पसरलेल्या अनेक कार्यालयातून या सुविधा उपलब्ध आहेत. महत्त्वाच्या बंदरांवरील कंटेनर स्टेशन्स, आतील भागांत असणारी मालसाठा केंद्रे, हवाई फ्रेट केंद्रे आदी ठिकाणांपर्यंत ही सेवा पोहोचली आहे.
‘’मेक-इन-इंडिया, जीएसटी व डिजिटल इंडिया या केंद्र सरकारच्या उपक्रमांमुळे लॉजिस्टिक क्षेत्रात क्रांती झाली आहे. व्यावसायिक व व्यापाऱ्यांना अधिक स्पर्धात्मक वातावरण राखता यावे यासाठी लॉजिस्टिकवरील खर्च कमी करणे हे आता या क्षेत्राचे उद्दिष्ट आहे. केरी इंडेव्ह एक्स्प्रेसच्या माध्यमातून आमची कंपनी सक्षम, स्पर्धात्मक व सर्वसमावेशक लॉजिस्टिक सेवा प्रदान करेल’’, असा विश्वास डॉ. एस. झेव्हिअर ब्रिटो यांनी व्यक्त केला.
केरी इंडेव्हची देशभरात सर्वदूर डिलिव्हरी सुविधा, आठ नव्या लॉजिस्टिक सेवांचा शुभारंभ
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
08 May 2019 01:26 PM (IST)
भारतीय सीमाशुल्क खात्याने या कंपनीला ऑथोराइज्ड इकॉनॉमिक ऑपरेटरचा (एईओ) तसेच, ट्रान्सपोर्ट असेट्स प्रोटेक्शन (टीएपीए) आणि गुड डिस्ट्रिब्युशन प्रॅक्टिसचा (जीडीपी) दर्जा दिला आहे.
- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -