मुंबई : नारायण राणेंनी आत्मचरित्रातून केलेल्या आरोपांचं माजी मुख्यमंत्री मनोहर जोशींनी खंडन केलं आहे. नारायण राणेंनी आपल्या आत्मचरित्रात बाळासाहेबांनी फोन करुन बोलवणं आणि उद्धव ठाकरेंनी दिलेली धमकी या आरोपात तथ्य नसून या गोष्टी मी पहिल्यांदाच ऐकत असल्याचे शिवसेना नेते मनोहर जोशी यांनी सांगितले.

जोशींच्या वागणुकीमुळे शिवसेनेची आज वाईट अवस्था झाल्याचा आरोपही राणेंनी केला होता. मनोहर जोशींनी या सर्व आरोपांचं खंडन करत नारायण राणेंवरच टीकास्त्र सोडलंय. तसेच चांगलं शिक्षण महत्वाचं आहे, काही लोकं शिक्षित नाही असा टोलाही राणेंना लगावला.

मनोहर जोशी हे उद्धव ठाकरेंच्या जवळचे होते. मनोहर जोशींनी कान भरल्यानंतर उद्धव ठाकरेंनी राणेंना डावलून सुभाष देसाईंना विरोधी पक्ष नेते पद दिल्याचा दावा देखील राणेंनी पुस्तकात केला होता. या आरोपाचं देखील मनोहर जोशींंनी खंडन केलं आहे.

VIDEO | नारायण राणेंच्या आत्मचरित्रात उद्धव ठाकरेसंदर्भात खळबळजनक गौप्यस्फोट | एबीपी माझा



मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते नारायण राणेंच्या आत्मचरित्राचं प्रकाशन होणार आहे. आत्मचरित्रांतून अनेक गुपितं उघड करण्याचे संकेत आधीच राणेंनी 'एबीपी माझा'शी बोलताना दिले होते.

नारायण राणेंनी 1972 मध्ये शिवसेनेतून राजकीय कारकीर्दीला सुरुवात केली. 1 फेब्रुवारी 1999 ते 17 ऑक्टोबर 1999 या काळात नारायण राणेंनी महाराष्ट्राचं मुख्यमंत्रीपद भूषवलं होतं. आघाडीची सत्ता असताना 2005 साली त्यांनी शिवसेनेतून काँग्रेसमध्ये प्रवेश केला. 2017 मध्ये त्यांनी काँग्रेसला रामराम करत ‘महाराष्ट्र स्वाभिमान पक्ष’ या नवीन पक्षाची स्थापना केली.

नारायण राणेंनी आत्मचरित्रांत काय म्हटलं आहे?

'राणेंना पक्षात ठेवलंत, तर मी घर सोडेन, असं उद्धव ठाकरेंनी बाळासाहेबांना सांगितलं होतं. शिवसेनेच्या सर्व पदांचा राजीनामा दिल्यानंतर बाळासाहेबांनी आपल्याला बोलावलं होतं. त्यावेळी उद्धव ठाकरेंनी बाळासाहेबांना स्पष्ट सांगितलं होतं, की राणेंना पक्षात ठेवलं तर मी आणि रश्मी घर सोडून जाऊ', असा दावा राणेंनी केला आहे.

शिवसेना का सोडली यामागचं खरं कारण आत्मचरित्रात आहे. उद्धव ठाकरेंनी लोकांना कसा त्रास दिला, ते या चरित्रात लिहिलं आहे, असंही नारायण राणेंनी सांगितलं होतं. शिवसेना, काँग्रेस आणि भाजप असा सर्व पक्षांमधील प्रवास लिहिल्याचं नारायण राणेंनी सांगितलं होतं. विशेष म्हणजे, उद्धव ठाकरे माझे दुश्मन नाहीत, फक्त वैचारिक मतभेद आहेत, असं स्पष्टीकरण राणेंनी दिलं होतं.

Narayan Rane | काय सांगतात नारायण राणेंचे ग्रहतारे? | ग्रहताऱ्यांच्या गल्लीतून दिल्ली | ABP Majha