मुंबई : मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावर मोठा अपघात टळला. भारतीय हवाई दलाचं AN-32 मालवाहक विमान मंगळवारी रात्री उशिरा उड्डाण करताना धावपट्टीच्या पुढे निघून गेलं. सुदैवाने या घटनेत कोणीही जखमी झालेलं नाही. विमान दुर्घटनेनंतर मुंबई विमानतळ काही काळासाठी बंद करण्यात आलं होतं, परिणामी प्रवाशांना अडचणींचा सामना करावा लागला.

विमातळावरील अधिकाऱ्यांची या वृत्ताला दुजोरा दिला आहे. ते म्हणाले की, "हवाई दलाचं विमान रात्री 11 वाजून 39 मिनिटांनी धावपट्टी सोडून पुढे निघून गेलं. हे विमान कर्नाटकमधील बंगळुरुजवळील हवाई दलाच्या येळाहांका या तळावर जात होतं."

ही धावपट्टी सध्या सेवेत नाही
AN-32 विमान हे मुंबई विमानतळाच्या धावपट्टी क्रमांक 27 वर धावलं. ही धावपट्टी सध्या सेवेत नाही. घटनेनंतर AN-32 ची धावपट्टी बंद करण्यात आली आहे. धावपट्टी बंद केल्याने प्रवाशांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागला. विमानतळावर मोठ्या रांगा लागल्या. लोकांनी ट्वीट करुन याची तक्रारही केली.

या अपघातानंतर अनेक उड्डाणं इतर विमानतळांवर वळवावी लागली. इंडिगो आणि स्‍पाईस जेटची उड्डाणं क्रमश: अहमदाबाद आणि सूरतला वळवावी लागली.