मुंबई: बनावट कॉल, मेसेजद्वारे लॉटरी लागल्याचे सांगत, बँक डिटेल्स मागवून लुटल्याच्या अनेक घटना घडल्या आहेत. त्यातच आता अशा बदमाशांनी थेट व्हॉट्सअपवर मेसेज आणि ऑडिओ पाठवायला सुरुवात केली आहे. त्यासाठी थेट कौन बनेग करोडपती अर्थात केबीसीच्या नावे बनवेगिरी सुरु केली आहे.


“आम्ही कौन बनेगा करोडपतीमधून बोलत आहोत. तुम्हाला 35 लाख रुपयांची लॉटरी लागली आहे, असा मेसेज असलेला फोटो व्हॉट्सअपवर पाठवण्यात येत आहे. +92 3061515770 या नंबरवरुन हा मेसेज पाठवण्यात आला आहे. इतकंच नाही तर याच नंबरवरुन ऑडिओ मेसेज पाठवून त्यात, “आम्ही केबीसी कौन बनेगा करोडपती स्कीममधून बोलत आहोत. केबीसीमध्ये ऑल इंडिया ऑल सिम कार्ड लकी ड्रॉ स्पर्धा आयोजित केली होती. यामध्ये 25 नंबर निवडण्यात आले. यापैकी काही लकी नंबर निवडण्यात आले आहेत. त्यामध्ये तुमच्या नंबरचाही समावेश आहे. तुमचा नंबरने 35 लाख रुपये जिंकले आहेत. या लॉटरीबाबतच्या अधिक माहितीसाठी तुम्हाला एक पेपर/फोटो पाठवण्यात आला आहे. त्यावर तुमचा लॉटरी नंबर आणि हेड ऑफिसचा नंबर आहे. त्या नंबरवर कॉल करुन, व्हॉट्सअप करुन तुम्ही डिटेल्स घेऊ शकता”, असं या ऑडिओमध्ये म्हटलं आहे.

+92 पाकिस्तानचा नंबर

लॉटरीचा हा मेसेज +92 3061515770 या नंबरवरुन व्हॉट्सअपवर पाठवण्यात आला आहे. महत्त्वाचं म्हणजे +92 हा कोडनंबर पाकिस्तानचा आहे. जसं भारतातील नंबरसाठी सुरुवातील +91 लागतं, तसं पाकिस्तानचा कोड +92 आहे.

या मेसेजवर अशोक स्तंभ, दोन छोटे तिरंगा झेंडे, आयकर भवनचा लोगो, केबीसीचा लोगो, अमिताभ बच्चन यांचा फोटो आहे. महत्त्वाचं म्हणजे या फोटोवर हजाराच्या जुन्या नोटा आहेत.

फसवणूक टाळा

लॉटरीबाबतचे अनेक मेसेज सध्या आपल्याला येतात. पण तुमचे बँक डिटेल किंवा आर्थिक माहिती कोणालाही देऊ नका. फसवणूक टाळण्यासाठी खबरदारी घ्या, असं आवाहन पोलीस सातत्याने करत आहेत.