मुंबई : दहीहंडी उत्सव आता नव्या रुपात पाहायला मिळणार आहे. आतापर्यंतच्या इतिहासात प्रथमच सरकारमान्य 'प्रो दहीहंडी'चा थरार रंगणार आहे.
'प्रो दहीहंडी'साठी मान्यता मिळावी, अशी मागणी ठाण्यातील शिवसेनेचे आमदार प्रताप सरनाईक यांनी सरकारकडे केली होती. अखेर राज्याच्या क्रीडा विभागाने दहीहंडीला 'प्रो दहीडंडी' म्हणून मान्यता दिली आहे.
ठाण्यातील शिवसेना आमदार प्रताप सरनाईक यांच्या 'संस्कृती प्रतिष्ठान'तर्फे पहिल्यावहिल्या 'प्रो दहीहंडी' स्पर्धेचं आयोजन करण्यात येणार आहे. गोकुळाष्टमीला संध्याकाळी ही स्पर्धा रंगणार आहे. क्रीडा मंत्री विनोद तावडे आणि क्रीडा खात्याचे सचिवही या स्पर्धेला उपस्थित राहणार आहेत.
'प्रो दहीहंडी'साठी शासनाकडून खास नियमावली तयार करण्यात आली आहे. कमीत कमी वेळेत थर रचणाऱ्या पथकाला बक्षीस मिळणार असून स्पर्धेत एकूण दहा पथकांचा यात समावेश असेल.
गोकुळ अष्टमी काही दिवसांवर येऊन ठेपली असल्याने दहीहंडीसाठी गोविंदा पथकांचा जोरदार सराव सुरु आहे. आता 'प्रो दहीहंडी' स्पर्धेला मान्यता मिळाल्याने गोविंदांना हुरुप आला असेल, हे मात्र नक्की.