कल्याण : दोन वर्षांपूर्वी 200 ग्रॅम सोनं घेऊन पळ काढणाऱ्या चोरट्याला कल्याणमधील बाजारपेठ पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. पश्चिम बंगालच्या हुबळीमधून त्याला पोलिसांनी अटक केली. महत्त्वाचं म्हणजे चोरीला गेलेलं सहा लाख किंमतीचं 200 ग्रॅम सोनं देखील हस्तगत करण्यात पोलिसांनी यश आलं आहे. मिराजउद्दीन शेख असं या चोरट्याचं नाव आहे. 


सोनाराच्या दुकानात पॉलिशचं काम करणाऱ्या एका कामगाराने पॉलिशसाठी दिलेले 200 ग्रॅम सोनं घेऊन पळ काढल्याची घटना दोन वर्षापूर्वी कल्याणच्या बाजारपेठ परिसरात घडली होती. या प्रकरणी बाजारपेठ पोलीस या चोरट्याचा शोध घेत होते. दोन वर्ष हा चोरटा पोलिसांना चकवा देत होता. अखेर दोन वर्षानंतर त्याचा ठावठिकाणा सापडल्यावर पोलिसांनी त्याला पश्चिम बंगाल इथून अटक केली. त्याच्याकडून चोरीला गेलेलं 6 लाख किमतीचं 200 ग्राम सोनं देखील हस्तगत केलं आहे. 


कल्याण बाजारपेठ गांधी चौक इथे मुबारक शेख यांचं सोन्याचे दागिने पॉलिश करुन देण्याचं दुकान आहे. त्यांच्या दुकानात मिराजुउद्दीन हा दागिने पॉलिश करुन देण्याचं काम करत होता. 23 नोव्हेंबर 2019 रोजी मुबारक यांनी मिरजउद्दीन याला 200 ग्राम वजनाचे सोन्याचे दागिने पॉलिश करण्यासाठी दिले होते. अचानक एवढे दागिने पाहून मिरजउद्दीनची बुद्धी भ्रष्ट झाली. हे दागिने घेऊन त्याने पळ काढला. याबाबत मुबारक यांनी बाजारपेठ पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली होती. बाजारपेठ पोलिसांनी गुन्हा दाखल करत त्याचा शोध सुरु केला. मिराजउद्दीन हा पसार झाला होता. दोन वर्षे पोलीस त्याच्या मागावर होते. मात्र मिरजउद्दीन ठिकाण बदलत पोलिसांना चकवा देत होता. अखेर काही दिवसांपूर्वी पोलिसांना त्याचा ठावठिकाणा मिळाला. तो पश्चिम बंगाल इथल्या हुबळी जिल्ह्यातील आमग्राम इथे असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्या ठिकाणी बाजारपेठ पोलिसांनी सापळा रचला आणि मिराजउद्दीन दिसताच त्याला ताब्यात घेतलं. 


त्याची चौकशी केली असता त्याच्याकडून 100 ग्रॅम सोने हस्तगत केलं. त्यानंतर पोलिसांनी त्याला कल्याणमध्ये आणलं. पोलीस कोठडीत चौकशीअंती त्याने उर्वरित सोनं आई आजारी असल्याचं कारण देऊन दुकानदारांना विकलं असल्याची कबुली दिली. पोलिसांनी पश्चिम बंगाल इथे विकलेलं 100 ग्राम सोनं देखील हस्तगत केलं आहे. सोनं कोणाला विकल्याची कबुली दिली आणि पोलिसांनी गुरुवारी 100 ग्राम सोन्याचे दागिने हस्तगत करण्यात यश मिळवलं. तब्बल दोन वर्षांनी पोलिसांनी हे 200 ग्रॅम सोने हस्तगत केलं.