Railway Video Viral : कल्याणकडून गोरखपूरकडे जाणाऱ्या गोदान एक्स्प्रेसची अज्ञात प्रवाशाने चैन खेचल्याची घटना काल दुपारच्या सुमारास घडली होती. त्यामुळे ही गाडी आंबिवली आणि शहाड दरम्यान थांबली. मात्र ज्या बोगीतील चैन खेचण्यात आली होती ती बोगी नदीवरील पुलावर थांबल्याने ती चैन सुस्थितीत आणण्याचे आव्हान रेल्वेसमोर उभे ठाकले होते. अखेर गोदान एक्स्प्रेसचे सहायक लोको पायलट सतीश कुमार मिश्रा यांनी आपला जीव धोक्यात घालून गाडीखालील पुलाच्या रेलिंगवरून जात ब्रेकचा खटका वर केला, यानंतर गाडी मार्गस्थ झाली. 


दरम्यान रेल्वेचा नदीवरील पुल हा केवळ पटरी इतकाच असल्याने या पुलावर उभे राहणे अशक्य असल्याने गाडीखाली जाऊन ब्रेकचा खटका वर करायचे मोठे आव्हान होते. अखेर गाडीचे सहायक लोको पायलट यांनी चालकाची परवानगी घेत गाडीला लटकून खाली जात त्यांनी खटका वर केल्यानंतर ही गाडी मार्गस्थ झाली. 






या सर्व प्रकाराचा व्हिडीओ त्यांच्याबरोबर असलेल्या त्यांच्या एका साथीदाराने आपल्या मोबाईलमध्ये काढला. सहायक लोको पायलट सतीश कुमार मिश्रा यांच्या या कौतुकास्पद कामगिरीचा व्हिडीओ पाहिल्यानंतर रेल्वेच्या अधिकाऱ्यांनी त्यांच्या धाडसाचे कौतुक केलं आहे. शिवाय प्रवाशांनी कारण नसताना आपल्याबरोबर प्रवास करणाऱ्या हजारो प्रवाशांचा जीव धोक्यात घालू नये असे आवाहन केले आहे.


मध्य रेल्वेचे मुख्य जनसंपर्क अधिकारी शिवाजी सुतार यांनी म्हटलं आहे की, सहाय्यक लोको पायलट, सतीश कुमार यांनी स्वतःचा जीव धोक्यात घालून टिटवाळा व खडवली स्थानकांदरम्यान नदीच्या पुलावर थांबलेल्या ट्रेन 11059 गोदान एक्स्प्रेसची अलार्म चेन रीसेट केली. प्रवाशांना विनंती आहे की, अलार्म चेन अनावश्यकपणे ओढू नका, ही सुविधा फक्त आपत्कालीन परिस्थितीसाठी आहे, असं त्यांनी म्हटलं आहे. त्यांनी हे आवाहन करताना संबंधित व्हिडीओ देखील ट्वीट केला आहे.