Kalyan News : विठ्ठलवाडी स्थानकातून मुंबईकडे जाणाऱ्या मेल समोर आत्महत्येचा प्रयत्न करणाऱ्या 18 वर्षीय युवकाचा पोलीस नाईक ऋषिकेश माने यांच्या धाडसामुळे जीव वाचल्याची घटना घडली. बुधवारी दुपारी अडीच वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली. स्वत: च्या जीवाची पर्वा न करता या तरुणाच्या मागोमाग ट्रॅकमध्ये उडी मारून त्याला ट्रकच्या बाहेर ढकलत त्यांनी त्याचा जीव वाचवला. क्षणार्धात घडलेल्या या घटनेनंतर त्यांच्या या धाडसाचं सर्वत्र कौतूक होत आहे.


उल्हासनगर 5 मधील प्रेमनगर टेकडी परिसरात राहणारा कुमार पुजारी हा 18 वर्षीय तरुण काल (बुधवारी) दुपारी विठ्ठलवाडी रेल्वे स्थानकाच्या फलाटावर होता. मात्र या फलाटावर ड्युटीवर असलेल्या माने यांना संशय आल्यानं ते त्यांच्यावर लक्ष ठेवून होते. दुपारी अडीच वाजण्याच्या सुमारास मदुराई एक्स्प्रेस विठ्ठलवाडी स्थानकात दाखल होत होती. त्यावेळी गाडीचा वेग जास्त असतानाही कुमार यानं आत्महत्या करण्याच्या उद्देशानं चालत्या गाडीसमोर उडी मारली. मात्र त्याच्याच मागे असलेल्या माने यांना क्षणार्धात काय घडणार याची कल्पना आल्यानं त्यांनी स्वतः च्या जीवाची पर्वा न करता त्याच्या मागोमाग ट्रॅकवर उडी मारली. क्षणार्धात त्याला पुढच्या ट्रॅकवर ढकलत स्वतः ट्रॅकबाहेर झोकून दिलं. इतक्यात वेगाने मेल धडधडत निघून गेली. 



डोळ्याच्या पापण्यांची उघडझाप होत नाही, तोवर घडलेल्या घटनेनं प्रवाशांसह सर्वांचा श्वास रोखला गेला होता. मात्र मेल निघून गेल्यानंतर या युवकासह माने यांना सुखरुप पाहून सर्वांचा जीव भांड्यात पडला. पोलिसांनी या युवकाला कल्याण रेल्वे पोलीस ठाण्यात आणून त्यांच्या पालकांना पोलीस ठाण्यात बोलावलं आहे. या तरुणाचं पोलिसांनी समुपदेशन केलं. तर तरुणाचे प्राण वाचवणाऱ्या माने यांच्यावर कौतुकाचा वर्षाव होत आहे.


महत्त्वाच्या इतर बातम्या : 



LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह | ABP Majha