मुंबईतील अंधेरी पूल दुर्घटनेनंतर 20 जुलै रोजी पत्री पुलाचं स्ट्रक्चरल ऑडिट करण्यात आलं होतं. आयआयटी मुंबई, केडीएमसी आणि रेल्वेने केलेल्या या ऑडिटमध्ये 104 वर्ष जुना असलेला पत्री पूल धोकादायक असल्याचं समोर आलं होतं. त्यामुळे आधी अवजड वाहतुकीसाठी आणि 22 ऑगस्टपासून सर्व प्रकारच्या वाहतुकीसाठी पत्री पूल बंद करण्यात आला होता. तर 24 ऑगस्टपासून या पुलाच्या पाडकामाला सुरुवात होणार होती.
मात्र एकीकडे मुंब्रा बायपासचं काम सुरु असल्याने शिळफाटा-कल्याण-भिवंडी या मार्गावर वाहतुकीचा भार वाढला होता. त्यामुळे मुंब्रा बायपासचं काम पूर्ण होईपर्यंत पत्री पुलाच्या पाडकामाला स्थगिती मिळाली होती. मात्र आता मुंब्रा बायपासचं काम पूर्ण झालं असून त्यामुळे आजपासून पत्री पुलाच्या पाडकामाला सुरुवात करण्यात येणार असल्याची माहिती रेल्वेने दिली आहे.
दुपारनंतर या कामाला सुरुवात होणार असून आधी पुलावरील युटिलिटी सर्व्हिसेस काढण्यात येणार आहे. तर शेवटच्या टप्प्यात मेगाब्लॉक घेऊन पत्री पुलाचा गर्डर उचलण्यात येणार आहे. त्यानंतर एमएसआरडीसीच्या माध्यमातून याच ठिकाणी तीन महिन्यांत नवीन उड्डाणपूल उभारण्यात येणार आहे.