मुंबई: "मला केवळ भाजपतूनच नव्हे तर शिवसेनेतूनही ऑफर आहे. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी घरी परत येण्याचं आवाहन केलं आहे", असा दावा काँग्रेस आमदार कालिदास कोळंबकर यांनी केला. ते एबीपी माझाशी बोलत होते. नारायण राणे यांचे कट्टर समर्थक असलेले आमदार कालिदास कोळंबकर हे भाजपच्या वाटेवर असल्याची चर्चा आहे. त्या पार्श्वभूमीवर एबीपी माझाने कोळंबकर यांची प्रतिक्रिया जाणून घेतली.


यावेळी कोळंबकर यांनी भाजपकडूनच नव्हे तर शिवसेनेकडूनही आपल्याला ऑफर असल्याचा दावा केला.

कोळंबकर म्हणाले, “बीडीडी चाळ आणि माझ्या मतदार संघातील कामं मुख्यमंत्र्यांनी केली. मुख्यमंत्री विरोधीपक्षात होते, तेव्हापासून मी त्यांचा चाहता आहे. ते सरकारवर तुटून पडायचे. मुख्यमंत्री झाल्यावर ते सभागृहात बोलले कालिदास लोकांची काम घेऊन येतात, मी काम करणार”

इतकंच नाही तर  काँग्रेसच्या लोकांनी त्यांच्या होर्डिंगवरुन माझे फोटो काढले, मग मी त्यांचे का लावू, असा सवाल कोळंबकर यांनी उपस्थित केला.

कालिदास कोळंबकर यांनी गणेशोत्सवाच्या शुभेच्छा देताना मुख्यमंत्र्यांसोबतचे होर्डिंग लावले होते. त्याबाबत अशोक चव्हाण यांनीही आपल्याला विचारल्याचं त्यांनी सांगितलं.  त्यावेळी मी त्यांना सांगितलं की माझी कामं मुख्यमंत्री करत आहेत, म्हणून पोस्टर्स लावले, असं कोळंबकर म्हणाले.

कालिदास कोळंबकर भाजपच्या वाटेवर?

काँग्रेस आमदार कालिदास कोळबंकर हे भाजपच्या वाटेवर असल्याची चर्चा पुन्हा रंगली आहे. बीडीडी चाळ पुनर्वसनाच्या कामात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पुढाकार घेतल्यापासून, कालिदास कोळंबकर हे  मुख्यमंत्र्यांच्या जवळ आहेत. यापूर्वीही कोळंबकर हे भाजपमध्ये जाण्याची चर्चा रंगली होती. ते सातत्याने मुख्यमंत्र्यांच्या कामाचं कौतुक करत आहेत.

कोण आहेत कालिदास कोळंबकर?

कालिदास कोळंबकर हे मुंबईतील वडाळा मतदारसंघातून काँग्रेसचे आमदार आहेत. ते सलग सात वेळा आमदार म्हणून निवडून आले आहेत. काँग्रेसआधी ते शिवसेनेत होते. मात्र, राणेंसोबत ते काँग्रेसमध्ये आले. काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांचे ते कट्टर समर्थक मानले जातात.

कट्टर राणे समर्थक कोळंबकर!

नारायण राणे ज्यावेळी शिवसेनेतून बाहेर पडले, त्यावेळी जे आमदार राणेंसोबत काँग्रेसमध्ये आले, त्यामध्ये आमदार कालिदास कोळंबकरही होते. विशेष म्हणजे राणेंसोबत काँग्रेसमध्ये आलेले बहुतेक आमदार त्यांना सोडून गेले. स्वत: राणेही काँग्रेससोडून गेले. मात्र कोळंबकर तरीही काँग्रेसमध्ये राहून राणेंना पाठिंबा देत राहिले.

...तर अनेक कार्यकर्ते माझ्यासोबत भाजपमध्ये येतील : कोळंबकर

“भाजपमध्ये जायचं असेल, तर अनेक कार्यकर्ते माझ्यासोबत येत आहेत आणि माझ्यामुळे पक्षाला किती फायदा होईल, याची जाणीव त्या पक्षाच्या नेत्यांना आहे.”, असे कोळंबकरांनी वर्षभरापूर्वी म्हटलं होतं. त्यादरम्यान राणेंनी काँग्रेस सोडली होती.

संबंधित बातम्या 

काँग्रेस आमदार कालिदास कोळंबकर भाजपच्या वाटेवर?  


सडेतोड कोळंबकर... वांद्र्याच्या निवडणुकीपासून राणेंच्या भाजपप्रवेशापर्यंत!