कल्याण : मोटरमनच्या सतर्कतेमुळे कल्याणमध्ये डेक्कन एक्स्प्रेस आणि आसनगाव लोकलची टक्कर टळल्या घटना समोर आली आहे. लोकलच्या मोटरमनला वेळीच डेक्कन एक्स्प्रेसची बोगी दिसल्यामुळे मोठा अपघात टळला. प्रवाशांचे प्राण वाचवणाऱ्या आसाराम वर्मा यांना बक्षीस देण्याची मागणी केली जात आहे.


मुझफ्फरनगरमध्ये ज्या दिवशी उत्कल एक्स्प्रेसचे 13 डबे घसरुन 22 प्रवाशांचे प्राण गेले, त्याच दिवशी कल्याण
स्टेशनजवळ हा प्रकार घडला.

आसनगाव-सीएसटी लोकल कल्याणपासून जलद मार्गावर धावते. मात्र सुदैवाने लोकलचे मोटरमन आसाराम वर्मांनी क्रॉसओव्हर पॉइंटवर उभी असलेल्या डेक्कन एक्स्प्रेसची शेवटची बोगी पाहिली. त्यांनी तात्काळ ब्रेक लावल्यामुळे दोन्ही गाड्यांची संभाव्य टक्कर टळली, अशी माहिती सेंट्रल रेल्वे मजदूर संघाच्या मुंबई विभागातर्फे देण्यात आली.

लोकलचे मोटरमन आसाराम वर्मा म्हणतात :

शनिवारी सकाळी 8 वाजले होते. कल्याणच्या प्लॅटफॉर्म क्रमांक 3 वरुन मी निघालो. फास्ट ट्रॅकवर क्रॉसओव्हर
करण्याच्या तयारीत होतो. सिग्नल क्रमांक 17 लाल असल्यामुळे 10 ते 15 मीटर अंतरावर मी थांबलो. दोन मिनिटांनी सिग्नल पिवळा झाला आणि मी निघालो. तेवढ्यात मला क्रॉसओव्हर पॉईंटला डेक्कन एक्स्प्रेसचा शेवटचा कोच दिसला आणि मी तत्परतेने ट्रेन थांबवली. मी तसं केलं नसतं, तर ट्रेन धडकलीच असती.

सदोष सिग्नलिंग सिस्टममुळे हा प्रकार झाल्याचा दावा सेंट्रल रेल्वे मजदूर संघाच्या मुंबई विभागाचे अध्यक्ष विक्रम सोळंकी यांनी केला आहे. याची चौकशी करुन दोषींवर कारवाई करण्याची मागणीही त्यांनी केली आहे.