कल्याण : प्लास्टिक (Plastic) पिशव्यांवर कारवाई गलेल्या सहाय्यक आयुक्त आणि त्यांच्या पथकावर एपीएमसी मार्केट (APMC Market) मधील व्यापाऱ्यांनी हल्ला केल्याची धक्कादायक घटना कल्याणमध्ये समोर आली आहे. सहाय्यक आयुक्तांसह पालिकेचे पथक प्लास्टिकच्या पिशव्यावर कारवाई करण्यासाठी एपीएमसी मार्केटमध्ये गेले, त्यावेळी मार्केटमधील लाईट बंद करत शिवीगाळ करत पथकाला कांदे फेकून मारले. आज पहाटे पाच वाजेच्या सुमारास ही घटना घडली आहे. या प्रकरणी तक्रार केली जाणार असल्याचे अधिकाऱ्याकडून सांगण्यात आले. या घटनेचा केडीएमसी पालिसेच्या कामगार संघटनेकडून निषेध नोंदविण्यात आला आहे.


कल्याण-डोंबिवली महापालिका क्षेत्रात महापालिकेकडून प्लास्टिक बंदीबाबत ठोस पावले उचलण्यास सुरुवात केली आहे. या पार्श्वभूमीवर आज केडीएमसीचे सहाय्यक आयुक्त सुधीर मोकल आपल्या पथकासह पहाटे वाजण्याच्या सुमारास एपीएमसी मार्केटमध्ये प्लास्टिक पिशव्यांवर कारवाई करण्यास गेले. कारवाईदरम्यान मार्केटमधील व्यापाऱ्यांनी सहाय्यक आयुक्त मोकल आणि त्यांचे पथकाशी वाद घालण्यास सुरुवात केली. काही क्षणातच व्यापाऱ्यांनी मार्केटमधील लाईट बंद करून या पथकाला शिवीगाळ करत त्यांना कांदे फेकून मारले. व्यापाऱ्यांची वाढती गर्दी पाहता पथकाने तेथून काढता पाय घेतला. 


याबाबत पोलीस स्थानकात तक्रार करणार असल्याचे सहाय्यक आयुक्त सुधीर मोकल यांनी सांगितलं. केडीएमसी पालिसेच्या कामगार संघटनेने या हल्ल्याचा निषेध नोंदवला आहे. केडीएमसी कामगार संघटनेचे अधिकारी सचिन बासरे यांनी याप्रकरणी प्रतिक्रिया देताना म्हटले की, ''एपीएमसीमध्ये कारवाई हे आमचे काम नाही यासाठी एपीएमसीने स्वतंत्र पथक नेमले पाहिजे. आजच्या हल्ल्याचा कामगार संघटनेच्या वतीने तीव्र शब्दात निषेध नोंदवण्यात आला असून मारहाण करणाऱ्या विरोधात कारवाई करण्याची मागणी करण्यात आली आहे.''


महत्त्वाच्या बातम्या :



LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोड पाहा लाईव्ह - ABP Majha