Sulli Deals : 'बुली बाई' अ‍ॅप (Bulli Bai App Case) प्रकरणी कारवाई केल्यानंतर दिल्ली पोलिसांनी आता 'सुली डिल्स' अ‍ॅप प्रकरणातील मुख्य आरोपी आणि मास्टरमाईंड ओंकारेश्वर ठाकूरलाही अटक केली आहे. 'सुली डिल्स' अ‍ॅप निर्माता ओंकारेश्वर ठाकूरला न्यायालयाने चार दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. बुली बाई अ‍ॅप देशात चर्चेत असताना ही अटक झाली असून अनेक बड्या नेत्यांपासून ते सेलिब्रिटींनीही या अ‍ॅपवर कारवाईची मागणी सुरू केली आहे. बुली बाई प्रकरणात पोलिसांनी चार आरोपींना अटक केली मात्र सुली डील्स प्रकरणात ही पहिलीच अटक आहे.


काय आहे 'सुली डिल्स' अ‍ॅप?
सुली हा मुस्लिम महिलांबद्दल वापरला जाणारा अपमानास्पद शब्द आहे. 4 जुलै 2021 रोजी ट्विटरवर सुली डील्सच्या नावाने अनेक स्क्रीनशॉट शेअर करण्यात आले. अ‍ॅपवर 'सुली डील ऑफ द डे' अशी टॅगलाईन वापरण्यात आली होती आणि ती मुस्लिम महिलांच्या फोटोंसोबत शेअर केली जात होती. हे फोटोही 'गिटहब' (Github) अ‍ॅपवर एका अज्ञात ग्रुपने तयार केले होती. या प्रकरणी तक्रारही करण्यात आली होती, मात्र अनेक महिने त्यावर कारवाई झाली नाही.


कसा रचला गेला कट?
सुली डिल्स अ‍ॅपचे निर्माते सोशल मीडिया अकाउंटवरून बेकायदेशीरपणे विविध मुस्लिम महिलांची छायाचित्रे गोळा करुन त्यावर आक्षेपार्ह मजकूर लिहून त्यांची छायाचित्रे ट्रोल करायचे. यामध्ये मुस्लिम महिलांचे फोटो चुकीच्या पद्धतीने वापरले गेले. अ‍ॅपवर हे फोटो शेअर करण्यात येऊन त्यांचा लिलावही करण्यात यायचा.


दिल्लीतील स्पेशल सेलचे पोलीस उपायुक्त केपीएस मल्होत्रा​यांनी सांगितले की, सुली डील्सचा अ‍ॅप निर्माता ओंकारेश्वर ठाकूरला अटक करण्यात आली आहे. ठाकूरने कबूल केले की त्याने जुलै 2021 मध्ये गिटहबवर सुली डील्स अ‍ॅप तयार केले. अ‍ॅपवरून अनेक मुस्लिम महिलांचे फोटो त्यांच्या संमतीशिवाय लिलावासाठी अपलोड करण्यात आले होते. ठाकूर याने @gangescion या ट्विटर हँडलचा वापर करून जानेवारी 2020 मध्ये ट्विटरवरील TradeMahasabha नावाच्या गटात सामील झाला. ग्रुपच्या सदस्यांनी मुस्लिम महिलांना ट्रोल करण्याचा कट रचला होता. या सुली डिल्स प्रकरणावर कारवाईची मागणी झाल्यानंतर त्यांनी सोशल मीडियावरील फूटप्रिंट हटवले.



महत्त्वाच्या बातम्या :



LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोड पाहा लाईव्ह - ABP Majha