ठाणे : कोरोना काळात अनेक महत्त्वाचे प्रकल्प पूर्ण करण्याचा वेळ असूनही गेल्या 12 वर्षांपासून रखडलेला कळवा रेल्वे ब्रिज अजूनही अपूर्णच आहे. रेल्वेने आपल्या मार्गावरील गर्डर टाकून काम पूर्ण केले आहे, त्याला देखील अनेक वर्षे उलटली. मात्र, ब्रिज वर चढायचा आणि उतरायचा रस्ता जो ठाणे महापालिका बांधत आहे, तोच अपूर्ण असल्याने रोज प्रचंड ट्राफिक या फाटकाजवळ होते.


मध्य रेल्वेचे वेळापत्रक ज्या रेल्वे फाटकामुळे रोज बिघडते ते म्हणजे कळवा रेल्वे फाटक. खरंतर हे रेल्वे फाटक काही वर्षे आधीच बंद झाले असते. पण नेहमीप्रमाणे लालफितीच्या कारभारात ते अडकले. याच फाटकाच्या जागी एक पुल बांधण्याचे काम गेली अनेक वर्षे सुरू आहे. मात्र, या पुलाचे काम गेली बारा वर्षे पूर्ण होऊ शकले नाही. "कळवा रेल्वे फटकामुळे होत असलेला त्रास पाहून 2006 साली याठिकाणी 1 पूल बांधण्याचे ठरवले गेले, त्याला 2008 झाली ठाणे महानगरपालिकेने मंजूर घेऊन पूल बांधण्याच्या कामाला सुरुवात केली. मात्र, त्यानंतर कळवा पूर्वेला आणि पश्चिमेला पूल ज्या ठिकाणी उतरवायचा होता त्याजागी जमिनीचे अनेक वाद समोर आले, यातील मफतलाल कंपनीच्या जमिनीच्या वादामुळे सर्वात जास्त विलंब झाला", असे कळवा खारेगाव प्रवासी संघटनेचे अध्यक्ष सिद्धेश देसाई यांनी सांगितले. सिद्धेश देसाई गेली अनेक वर्षे या पूलाच्या बांधकामासाठी सरकार दरबारी पाठपुरावा करीत आहेत.



2008 साली मंजुरी मिळाल्यानंतर ठाणे महानगरपालिका आणि रेल्वेकडून या पुलाचे काम जास्तीत जास्त तीन ते चार वर्षात पूर्ण होणे अपेक्षित होते. पण तसे झाले नाही आणि आजही हा पूल अपूर्ण बांधून उभा आहे. रेल्वेने काही वर्षांपूर्वी त्यांच्या जागेवरील गर्डर टाकून, त्यांच्या वाट्याचे काम पूर्ण केले. मात्र, ठाणे महापालिकेकडून कामाला हवी तशी गती मिळाली नाही.


सर्वसामान्यांसाठी लोकल सुरू करण्यास रेल्वे अनुकूल; पण..


लॉकडाउन झाल्यापासून महत्त्वाची बांधकामे पूर्ण करण्याची मोठी संधी ठाणे महानगर पालिका प्रशासनाकडे होती. मात्र, त्या संधीचं सोनं त्यांना करता आले नाही. आता पुढील मार्च महिन्यात हा ब्रीज बांधून पूर्ण होईल, असे महापौर नरेश म्हस्के यांनी सांगितले आहे. "कोरोना काळात हे काम रखडले कारण मजूर आणि इतर गोष्टींचा तुटवडा होता. आता मात्र काम पूर्ण गतीने सुरू आहे, ते लवकर करण्याचे आदेश मी प्रशासनाला दिले आहेत, मार्च 2021 मध्ये हा पूल पूर्ण होईल", असे म्हस्के म्हणाले.


तर दुसरीकडे या दिरंगाईचा फटका कळवेकरांना भोगावा लागतोय. अनेकांचे जीव गेल्या अनेक वर्षात गेलेले आहेत. स्थानिकांच्या भावना ऐकून घ्यायला देखील कोणाकडे वेळ नाही. कळवा रेल्वे फाटक हे मध्य रेल्वेचे गेल्या अनेक वर्षांपासूनचे दुखणे आहे. सकाळी आणि संध्याकाळी गर्दीच्या वेळेस या फाटकामुळे सर्व गाड्या रखडतात. त्याचा थेट परिणाम मध्य रेल्वेच्या लाखो प्रवाशांवर होतो. या त्रासातून त्यांना ठाणे महानगरपालिका सोडवू शकते. मात्र, आता नवी डेडलाईन मिळाल्याने कळवेकर हवालदिल झाले आहेत.


#MumbaiLocal लोकल सुरू करण्यासाठी अटी-शर्तींवर सहमती नाही? गर्दीची जबाबदारी घेण्यावरून टोलवाटोलवी?