मुंबई : काँग्रेसचे राहुल गांधींच्या फळीतले महत्वाचे नेते म्हणजे ज्योतिरादित्य शिंदे. केंद्रात दोनदा मंत्री, काँग्रेस कार्यकारिणीचे सदस्य असं त्यांचं महत्वाचं स्थान. मध्य प्रदेशात सत्तांतर होऊन काँग्रेसचं सरकार आल्यावर शिंदेना मुख्यमंत्रिपदाचे वेध लागले होते. मात्र, काँग्रेसनं ज्येष्ठ नेते कमलनाथ यांना मुख्यमंत्री बनवलं. तेव्हापासूनच ज्योतिरादित्य आणि कमलनाथ व दिग्विजय सिंग यांचे खटके उडणं सुरू झालं होतं. याच विषयाशी संबंधित असाच प्रकार राजस्थानातही दिसला. तिथेही भाजपची सत्ता जाऊन काँग्रेस आली, मात्र सचिन पायलट या तरूण नेतृत्वाऐवजी काँग्रेसनं अशोक गहलोतांनाच मुख्यमंत्रीपदाची माळ घातली. दुसरीकडे, राहुल गांधींनीही पक्षाचं अध्यक्षपद सोडल्यानं काँग्रेसमधल्या यंग ब्रिगेडला कुणी वालीच राहिला नसल्याचं चित्र उभं राहिलं. अशा स्थितीत काँग्रेसमध्ये तरूण तुर्क विरूद्ध म्हातारे अर्क असा सामना सुरू झाला असून, म.प्र.तला प्रकार राजस्थानातही होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. याच पार्श्वभूमीवर आज 'माझा विशेष'ची चर्चा झाली.

चर्चेच्या सुरूवातीलाच काँग्रेस प्रवक्ते सचिन सावंत यांनी भाजप त्यांच्या निष्ठावंतांवर कसा अन्याय करतोय, अशी टीका केली. ज्योतिरादित्य यांना दोनदा मंत्रीपदं, खासदारकी आणि पक्षात वरिष्ठ पद दिल्यानंतरही काँग्रेसनं त्यांच्यावर अन्याय केला, असं कसं म्हणता येईल? असा सवालही त्यांनी उपस्थित केला. पक्षालाही अनेक गोष्टी पाहाव्या लागतात. भाजपमध्ये गेलेल्यांचं काय झालंय? ही भाजपला आलेली सत्तेची सूज आहे. ज्योेतिरादित्यांना घेतलं आहे तर आता त्यांना मुख्यमंत्रिपद द्यावं.

MP Political Crisis | शिंदेंच्या राजीनाम्यानंतर काँग्रेस-भाजपची आमदार वाचवा मोहीम

सांवत यांच्या वक्तव्याचा समाचार घेताना भाजप नेते डॉ. अनिल बोंडे यांनी काँग्रेसच्या कार्यशैलीवर टीका केली. केंद्रीय नेतृत्वाला आव्हान ठरेल अशा नेत्यांचं खच्चीकरण काँग्रेसमध्ये होतं. जगनमोहन रेड्डी, ज्योतिरादित्य, सचिन पायलट ही अशीच उदाहरणं आहेत. कमलनाथ आणि दिग्विजय सिंह या दोघांनी मिळून ज्योतिरादित्यांची कोंडी केली, अशी टीकाही त्यांनी केली.

वरिष्ठ पत्रकार अभय देशपांडे म्हणाले की, पक्षाला आणि आपल्याला भवितव्य नाही हे समजून चुकलेले नेते काँग्रेस सोडतायत. वरिष्ठ नेतृत्व आणि असंतुष्ट नेते यांच्या संवाद नाही. दुसरीकडे, भाजप आपला पक्ष वाढवण्यासाठी आणि प्रतिस्पर्धी पक्षाचं खच्चीकरण करण्यासाठी त्यांचे नेते फोडत असतो. तर, काँग्रेसमध्ये मात्र बाहेर जाणाऱ्या नेत्याला थांबवण्याऐवजी त्याला ढकलण्याचंच काम केलं जातं. पक्षाचा धाक नसल्यानं पक्षात व राज्यातही नेते स्वतंत्रपणे काम करतायत, असंही देशपांडे म्हणाले.

दिल्लीस्थित वरिष्ठ राजकीय विश्लेषक अशोक वानखडे यांनी काँग्रेसमध्ये केंद्रीय नेतृत्व आहेच कुठे? असा खरमरीत सवाल केला. त्या पक्षात अराजक माजलं असून, जे ज्योतिरादित्य एक वर्षापासून नाराज होते त्यांना भेटीसाठी वेळही दिला जात नव्हता, यावरुनही वानखडेंनी टीका केली. ज्योतिरादित्य यांच्या पक्षांतरावरून नीतीमत्तेची भाषा करणारी काँग्रेस महाराष्ट्रात मात्र शिवसेनेसोबत जाते, अशी टिपण्णीही त्यांनी केली.

सा. विवेकचे माजी संपादक मकरंद मुळे यांनी, काँग्रेसला मास लीडरमुक्त करण्याचं नेतृत्वानं ठरवलं असावं, असं म्हणत, ज्यांनी राज्यपाल वापरले, सरकारं पाडली त्यांनी पक्षांतराबद्दल बोलू नये, असं मत मांडलं. सध्या काँग्रेस अंतर्गत धुसफुस चालू असून खुद्द राहुल गांधींनाच विरोध होत असल्याचा दावाही मुळे यांनी केला. याचीच परिणती ज्योतिरादित्य यांच्या पक्षांतरात दिसते, असंही ते म्हणाले.