एल्फिन्स्टन दुर्घटनेत ज्योतिबा चव्हाण यांचा मृत्यू
एबीपी माझा वेब टीम | 29 Sep 2017 08:35 PM (IST)
एल्फिन्स्टन दुर्घटनेत मुंब्रा इथे राहणाऱ्या ज्योतिबा चव्हाण यांचा मृत्यू झाला. ते कागदपत्र आणण्यासाठी परेलला गेले होते.
मुंबई : मुंबईतील एल्फिन्स्टन आणि परेल रेल्वे स्टेशनला जोडणाऱ्या पुलावर मोठी चेंगराचेंगरी झाली. या घटनेत 22 जणांचा मृत्यू झाला, तर 39 प्रवासी जखमी झाले आहेत. या दुर्घटनेत 22 कुटुंबांचा आधार हरपला आहे. राज्य आणि केंद्र सरकारने मिळून दहा लाख रुपयांची आर्थिक मदत जाहीर केली आहे. मात्र ही मदत गेलेल्या माणसाची उणीव भरुन काढणारी नाही. मुंब्र्यात राहणारे 29 वर्षीय ज्योतिबा चव्हाण जेएनपीटीला कामाला होते. कागदपत्र आणण्यासाठी परेलला गेले. काम संपवून मित्राचा निरोप घेऊन निघाले. मित्राने नंतर अनेकदा फोन करुनही ज्योतिबा चव्हाण यांनी त्याला प्रतिसाद दिला नाही. एल्फिन्स्टन घटनेबाबत मित्राला माहिती मिळाली. ज्योतिबा चव्हाणही याचवेळी स्टेशनला नसेल ना, अशी शंकेची पाल मित्राच्या मनात चुकचुकली आणि त्यांनी थेट केईएम रुग्णालय गाठलं. अखेर नको ते घडलेलं होतं. मित्राला ज्योतिबा चव्हाण यांचा मृत्यू झाल्याचं समजलं. ज्योतिबा चव्हाण हे त्यांच्या कुटुंबाचा एकमेव आधार होते. घरात दोन महिन्यांचं बाळ आणि तीन वर्षांची मुलगी आहे. ज्योतिबा चव्हाण यांच्या पत्नी आणि मुलांचं छत्र या घटनेमुळे हरपलं आहे. सरकारने मदत जाहीर केली आहे. मात्र या पीडित कुटुंबांना ती मदत किती दिवस पुरेल, हा प्रश्न आहे. संबंधित बातम्या :