मुंबई : मुंबईतील जे.जे. हॉस्पिटलचे अधिष्ठाता डॉ. तात्याराव लहाने यांना मोठा दिलासा मिळाला आहे. डॉ. लहाने यांची अॅट्रॉसिटीच्या प्रकरणातून निर्दोष मुक्तता झाली आहे. सबळ पुराव्यांअभावी सत्र न्यायालयाने डॉ. लहाने यांना निर्दोष ठरवलं आहे.


साल 2014 मध्ये लहाने यांच्यावर मुंबईच्या माझगांव महानगर दंडाधिकाऱ्यांकडे आरोपपत्र दाखल झालं होतं. जे.जे.रुग्णालयातील नरेश वाघेला नावाच्या सफाई कामगाराला जातीवाचक शिवीगाळ केल्याप्रकरणी जे.जे. मार्ग पोलीस ठाण्यात त्याच्यावर गुन्हा दाखल होता. त्यानंतर तात्याराव लहाने यांनी मुंबई सत्र न्यायालयातुन 15 हजारांचा अटकपूर्व जामीन मंजूर करुन घेतला.

या दरम्यान त्यांना जे.जे.परिसरात येण्यासही न्यायालयाने बंदी घातली होती. या आरोपपत्रात एकूण 14 साक्षीदारांचे जबाब आहेत. तात्याराव लहाने यांच्याविरोधात कोणताही सबळ पुरावा नसून त्यांच्याविरोधात बऱ्याच गोष्टी स्पष्ट नसल्याच लहाने यांचा दावा होता. ज्यावर आज शिक्कामोर्तब झालं आहे.