मुंबई : अनेक विषयांवर कमेंट करुन सोशल मीडियावर अॅक्टिव्ह असणारी अभिनेत्री जुही चावला (Juhi Chawla) तिच्या एका ट्वीटमुळे चर्चेत आली आहे. मुंबईतील वाढत्या प्रदूषणाच्या विषयावर तिने ट्वीट केलं असून आता दक्षिण मुंबईत फिरताना प्रदूषित हवा आणि दुर्गंधी पसरली असून तिचा त्रास होत असल्याच्या भावना व्यक्त केल्या आहेत. तिच्या या ट्वीटनंतर त्यावर अनेकांनी चांगल्या आणि वाईट कमेंट्स केल्या आहेत.
पर्यावरणाच्या आणि प्रदूषणाच्या मुद्द्यावर नेहमी सजग असणाऱ्या जुही चावलाने मुंबईतील प्रदूषित हवा आणि दुर्गंधी यावर ट्वीट केलं आहे. ती म्हणते की, कुणाला हवेतील दुर्गंधीची जाणीव होते का? या आधी वांद्रे, वरळी, मिठी नदीच्या, नाल्याच्या बाजूने जाताना ही दुर्गंधी यायची. आता याची व्याप्ती वाढली असून संपूर्ण दक्षिण मुंबईतच ड्रायव्हिंग करताना त्याची जाणीव होते. मुंबईतील हवेमध्ये दिवसेंदिवस दुर्गंधी वाढतच चालली आहे, प्रदूषणामध्ये वाढ होतच आहे. दिवसेंदिवस आपल्याला असं वाटतंय की आपण दुर्गंधी आणि हवेच्या प्रदूषणातच जगतोय.
जुही चावलाच्या या ट्वीटनंतर अनेकांनी त्यावर कमेंट केलीय. त्यामध्ये काहीजणांनी जुहीची बाजू घेतलीय तर काहींनी तिला ट्रोल केल्याचं दिसून येतंय.
जुही चावला बऱ्याच काळापासून अभिनयापासून दूर होती. पण नुकतंच ती परेश रावल यांच्यासोबत 'शर्माजी नमकीन' या चित्रपटात अभिनय करताना दिसून आली आहे. तसेच प्राईम व्हिडीओची वेब सिरीज 'हश हश'मध्येही तिने भूमिका केली होती.
उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची प्रतिक्रिया
अभिनेत्री जुही चावलाने प्रदूषणावर केलेल्या भाष्यावर राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रतिक्रिया दिली आहे. ते म्हणाले की, सेलिब्रेटिंनी असं जाहीरपणे म्हणायला नको. महापालिकेतील भ्रष्टाचारामुळे नागरिकांना या गोष्टी सहन कराव्या लागतात. पण आता सरकार बदललं आहे. हळूहळू या गोष्टी बदलत असून त्यामध्ये सुधारणा होत आहेत. मुंबई हे आंतरराष्ट्रीय शहर असून त्यावर असं सार्वत्रिकरित्या भाष्य करु नये.