सावनी सूर संगम यांनी आयोजित केलेल्या 'जर्नी ऑफ एक्सलन्स' या कार्यक्रमात झाकीर हुसैन यांच्या जादुई बोटांनी नेहमीप्रमाणे तबल्याचा ताबा घेतला आणि शेजारी बसलेला मास्टरब्लास्टरही भारावून गेला. नंतर दोघांनी एकमेकांशी मनमोकळ्या गप्पा मारल्या.
सचिन आणि संगीत यांचं नातं कसं आहे?
सचिन : बऱ्याचशा क्रिकेटर्सप्रमाणे मलाही म्युझिक आवडतं. एखादा खेळाडू तणावाखाली असेल, तर संगीत ऐकल्याने त्याला शांतता मिळते. टीम इंडियाची ड्रेसिंग रुमने नेहमीच संगीताने भारलेली असते. आम्ही बॉलिवूड गाण्यांपासून पंजाबी संगीतापर्यंत सर्व प्रकारच्या गाण्यांवर ठेका धरायचो. अगदी पाश्चात्य संगीतसुद्धा! आमच्या क्रिकेटच्या प्रवासात म्युझिक हा कायमच मूक साथीदार राहिला आहे.
संगीतकार आणि खेळाडू यांच्यात कशाप्रकारे साधर्म्य आहे?
सचिन : आपली पॅशन जपणं आणि उत्कृष्टतेचा ध्यास घेणं हे खेळाडू आणि संगीतकारांमधलं मुख्य साम्य आहे, असं मला वाटतं. प्रेक्षक आणि चाहत्यांवर आमचा खोलवर प्रभाव असतो. तुम्ही आतापर्यंत काय अचिव्ह केलंय, याने तितकासा फरक पडत नाही. प्रत्येक परफॉर्मन्स किंवा मॅच ही नवी सुरुवात असते. संगीत असो की खेळ, वेळ आली की षटकार किंवा षड्ज ठोकावाच लागतो.
तू भारतीय शास्त्रीय संगीत ऐकतोस का ?
सचिन : प्रामाणिकपणे सांगायचं तर मी फारसं क्लासिकल म्युझिक ऐकलेलं नाही. मला राग किंवा सूर कदाचित समजणारही नाहीत. पण मला खात्री आहे, की मी चांगला रसिक आहे.
उस्ताद झाकीर जी यांच्याशी बंध कसे जुळले?
सचिन : उस्तादजी क्रिकेटचे चाहते आहेत आणि मी म्युझिकचा दिवाना. माझ्या एका मित्राने माझा फोटो उस्तादजींना दिला आणि त्यांनी स्वतःचा स्पेशल फोटो स्वाक्षरी ठोकून मला पाठवला होता. 2011 मध्ये विश्वचषकाच्या वेळी आमची ही देवाणघेवाण झाली.
आम्हाला एकमेकांची व्यक्तिशः भेट घेण्याची खूप तीव्र इच्छा होती. मात्र जवळपास पाच वर्ष हा योग काही जुळून आला नाही. गेल्या वर्षी फेब्रुवारी महिन्यात आमच्या एका मित्राने भेट घडवून आणली. तीन तास आमच्या गप्पा रंगल्या आणि तेव्हाच असा एखादा कार्यक्रम करण्याची संकल्पना आमच्या डोक्यात रुजली.
या कार्यक्रमातून आम्हाला काय मिळणार?
सचिन : 'जर्नी ऑफ एक्सलन्स'बद्दल आम्ही गप्पा मारणार आहोत. आमचे अनुभव शेअर करत दिलखुलास उत्तरं देण्याचा आमचा प्रयत्न असेल. उस्तादजींचे परफॉर्मन्स ऐकण्याची संधी आपल्याला मिळणार आहे.
पाहा व्हिडिओ :