मुंबई : मुंबई महापालिका निवडणुकीच्या तोंडावर भाजप आणि शिवसेनेमधील कलगीतुरा शिगेला पोहोचला आहे. लालबागमध्ये झालेल्या सभेत मुंबई भाजपचे अध्यक्ष आशिष शेलार यांनी उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे या पितापुत्रांसह मनसे प्रमुख राज ठाकरेंवर  जोरदार टीका केली.

शिवसेनेने सामनाच्या अग्रलेखामधून 'ती काय करते' या सिनेमाच्या शिर्षकाची कोटी करून भाजपवर हल्लाबोल केला होता. मात्र आशिष शेलारांनी देखील त्याच शब्दात शिवसेनेवर पलटवार केला. तर आदित्य ठाकरे आणि राज ठाकरेंचा समाचार घेताना आशिष शेलारांनी चित्रपटातल्या प्रसिद्ध डायलॉगचा वापर केला.

आज अग्रलेख लिहिला, 'ती आज काय करते?'. आमचा हाच प्रश्न आहे, 'तुम्ही सध्या काय करता?', असे म्हणत आशिष शेलार यांनी शिवसेनेवर घणाघात केला.

राज ठाकरेंवर घणाघात

"काल एका नेत्याने प्रतिक्रिया दिली की, बुलेट ट्रेन आणुन मुंबईला महाराष्ट्रापासून तोडण्याचा डाव आहे. भाजपने काही काम केलं तर दादरमधून यांची प्रतिक्रिया तीच. खरंतर अशी प्रतिक्रिया देणारे दिवसभर चित्रपटच पाहत असतात. 'पछाडलेला' सिनेमातील बाब्या शहनाई ऐकली की, तो बोलतो 'बाबा लगीन' तसं यांचा एकच डायलॉग निवडणुकीचा बिगुल वाजला की, 'मुंबई तोडणार' सुरु.", अशी टीका आशिष शेलार यांनी राज ठाकरेंवर केली. शिवाय, मुंबईतून बुलेट जाणार असेल तर मुंबईला अन्य राज्याशी जोडण्याचा काम भाजप करते आहे, तोडण्याचा नाही.", असे सांगायलाही शेलार विसरले नाहीत.

लालबागमध्ये झालेल्या कार्यक्रमात युवा ब्रिगेडच्या सदस्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला. विशेष म्हणजे शिवसेनेचा बालेकिल्ला असलेल्या लालबागमध्ये सभा घेऊन भाजपने शिवसेनेला आव्हान दिलं आहे.

आशिष शेलार यांचं भाषण :