मुंबई : मुंबईत वाहतूक कोंडीच्या जोडीला आणखी एका मनस्तापाला मुंबईकरांना समोरं जावं लागत आहे. मुंबईत ठिकठिकाणी पूलबंदी झाली आहे. दुरुस्तीच्या, धोकादायक असल्याच्या कारणांवरुन मुंबईत गेले वर्षभरापासून ठिकठीकाणचे पूल बंद आहेत. आधीच रस्ते वाहनांनी भरलेले आणि त्यात महत्वाचे पूलही बंद असल्यामुळे मुंबईकरांची पूलकोंडी झाली आहे.
मुंबई महापालिकेनं नुकताच सांताक्रुझ पूर्व येथील हंस भुग्रा मार्गावरचा पूल धोकादायक म्हणून जाहीर केला आणि मुंबईतल्या बंद पुलांच्या संख्येत आणखी एका नव्या पूलाची भर पडली. गेले वर्षभर मुंबईकरांना पूल कोंडीचा सामना करावा लागत आहे. वर्षाअखेरीसही ते चित्र कायम आहे. धोकादायक म्हणून जाहीर केलेले पूल लवकर दुरुस्त व्हावेत, त्यांची पुन्हा नव्यांन बांधणी व्हावी, असं काही प्रशासनाला वाटलेलं नाही. त्यामुळे कोणत्याही दूर्घटनेचं पाप आपल्या माथी नको म्हणून पूलबंदीचा धडाकाच प्रशासनाने मुंबईकरांच्या माथी मारला आहे. मुंबईतील जवळपास 30 पूल आजही पूर्णत: किंवा अंशत: बंद अवस्थेत आहेत. ज्यावरुन धड वाहतूकही होत नाही, चालताही येत नाही. गर्दीच्या वेळी पर्यायी मार्गावरुन जाणं परवडतही नाही.
मुंबईतील पुलांची सद्यस्थिती
- लोअर परळ पुलाचं पाडकाम सुरु, वाहतुकीसाठी बंद
- करी रोड पुलावरुन अवजड वाहतूक बंद
- सायन पुलावर अवजड वाहनांना वाहतुकीस मनाई
- घाटकोपर स्थानकातील पादचारी पुलाच्या पायऱ्यांची दुरुस्ती सुरु
- मरिन लाइन्सचा पादचारी पूल पाडला
- चर्नीरोड पूल पादचाऱ्यांसाठी बंद
- पश्चिम रेल्वेवरील खार स्थानकास जोडणारा पूल दुरुस्तीसाठी बंद
- विलेपार्ले स्थानकातील पादचारी पूलाचे दोन भाग दुरुस्तीसाठी बंद
- मुंबई सेंट्रल रेल्वे स्थानकातील पूल पायऱ्या दुरुस्तीसाठी बंद
- सांताक्रुझ पूर्व येथील पश्चिम द्रुतगती मार्गाला जोडणारा पूल बंद
मुंबईतील आजवरच्या पूल दुर्घटना पाहता निष्काळजीपणा आणि वेळेवर न केलेली कामे यामुळे मुंबईकरांचे जीव गेले आहेत. दुर्घटना घडू नये यासाठी उपाय आवश्यक असतात. मात्र पुलांच्या सुधारणांचे उपाय योजण्याऐवजी प्रशासन पूलबंदीचा मार्ग अवलंबत आहे. त्यामुळे मुंबईकरांचे प्राण अधिकच कंठाशी येतात.