रांची : लोकसभेच्या निकालानंतर महाराष्ट्रापाठोपाठ आणखी एक राज्यात भाजपला फटका बसलाय. झारखंड विधानसभा निवडणुकीत भाजपची पीछेहाट झाली आहे. झारखंडच्या नागरिकांनी भाजपला नाकारत काँग्रेस आघाडीला स्पष्ट बहुमत दिलं आहे. झारखंडमध्ये काँग्रेस आघाडीला 46 जागा मिळाल्या असून भाजपला अवघ्या 25 जागांवर समाधान मानावं लागलं आहे. काँग्रेस आघाडीत झारखंड मुक्ती मोर्चाला 28 जागा मिळाल्या असून काँग्रेसला 16 जागा मिळाल्या आहेत.


झारखंडमध्ये एकूण 81 जागांवर मतदान झालं होतं. प्रचारात सत्ताधारी भाजप विरुद्ध झारखंड मुक्ती मोर्चा-काँग्रेस-राष्ट्रीय जनता दल यांच्या आघाडीत सरळ सामना झाला. बहुमतासाठी लागणारा 41 आकडा असून काँग्रेस आघाडीनं 46 जागांवर विजय मिळाला आहे. त्यामुळे काँग्रेस आघाडीचा सत्तास्थापनेचा मार्ग मोकळा झाला आहे. झारखंडमधील काही जागांवर अत्यंत चुरशीची लढाई पाहायला मिळाली. काँग्रेस, भाजप यांचे उमेदवार काहीशा फरकाने जिंकलेले पाहायला मिळाले.



निकालात सर्वात कमी फरकाने जिंकलेले उमेदवार

सिमडेगा मतदारसंघ : काँग्रेसचे भूषण बाडा अवघ्या 285 मतांनी विजयी

काँग्रेसच्या भूषण बाडा यांना एकूण 60,651 मतं पडली, तर भाजपच्या श्रद्धानंद बेसरा यांना 60,366 मतं पडली. 2014साली या मतदारसंघातून भाजपच्या विमला प्रधान 3194मतांनी विजयी झाल्या होत्या.

बाघमरा मतदारसंघ : भाजपचे दुलू महातो 824 मतांनी विजयी

भाजपच्या दुलू महातो यांना 78,291 मतं पडली असून काँग्रेसच्या जलेश्वर महातो यांना 77,467 मतं पडली. 2014 साली दुलू महातो 29,623 मतांनी विजयी झाले होते.

कोडर्मा मतदारसंघ : भाजपच्या डॉ. नीरा यादव यांचा 1797 मतांनी विजय

भाजपच्या डॉ. नीरा यादव यांना 63, 675 मतं पडली, तर राजदच्या अमिताभ कुमार यांना 61,878 मतं पडली. 2014 साली नीरा यादव 13525 मतांनी विजयी झाल्या होत्या.

मांडू मतदारसंघ : भाजपचे जयप्रकाश भाई पटेल 2062 मतांनी विजयी

भाजपचे जयप्रकाश भाई पटेल यांना 49,855 मतं पडली तर आजसूच्या निर्मल महातो यांना 47,793 मतं पडली. 2014साली जयप्रकाशभाई पटेल झामुमोकडून लढले होते आणि 7012 मतांनी विजयी झाले होते.

जामा मतदारसंघ : झामुमोच्या सीता मुरम 2426 मतांनी विजयी

झामुमोच्या सीता मुरम यांना 60,925 मतं मिळाली, तर भाजपच्या सुरेश मुरमू यांना 58,499 मतं पडली. 2014 साली सीता मुरमू 2306 मतांनी विजयी झाल्या होत्या.

देवघर मतदारसंघ : भाजपचे नारायण दास 2624 मतांनी विजयी

भाजपचे नारायण दास यांना 95,491मतं मिळाली, तर राजदच्या सुरेश पासवान यांना 92,867 मतं पडली. 2014 साली नारायण दास 45 हजार 152 मतांनी विजयी झाले होते.