Jharkhand election results 2019: रांची : झारखंड विधानसभा निवडणुकीचं चित्र आता जवळपास स्पष्ट झालं असून भाजपच्या हातातून आणखी एक राज्य निसटलं आहे. झारखंडमध्ये काँग्रेस-जेएमएम-राजद महायुतीचं सरकार स्थापन होणार आहे. महायुतीच्या फॉर्म्युल्यानुसार, जेएमएम नेता हेमंत सोरेन झारखंडचे नवे मुख्यमंत्री असणार आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी त्यांना ट्वीट करत शुभेच्छा दिल्या आहेत.


पंतप्रधान नरेंद्र मोदींनी ट्वीट करत म्हटलं की, 'झारखंड निवडणुकांमध्ये विजयी झाल्याबद्दल हेमंत सोरेन आणि काँग्रेस-जेएमएम-राजद महायुतीला शुभेच्छा. राज्यात सेवा करण्यासाठी त्यांना शुभेच्छा.'


पंतप्रधानांनी आणखी एक ट्वीट करत म्हटलं की, 'झारखंडच्या जनतेचे आभार. ज्यांनी भाजपला अनेक वर्ष जनतेची सेवा करण्याची संधी दिली.' तसेच पुढे बोलताना मोदी म्हणाले की, भाजप येणाऱ्या दिवसांतही झारखंडच्या जनतेची सेवा करत राहिल आणि जनेतेच्या हितासंबंधिच्या मुद्यावर आवाज उठवत राहिल.

संध्याकाळी सात वाजेपर्यंत 81 पैकी 23 जागांचे निकाल हाती आले असून 58 जागांवर मतमोजणी सुरू आहे. सरकारस्थापनेसाठी बहुमताचा आकडा हा 41 आहे. भाजप सध्या 16 जागांवर आघाडीवर आहे आणि 9 जागांवर भाजपचा विजय निश्चित झाला आहे. आजसू एका जागेवर विजयी झाली असून दोन जागांवर आघाडीवर आहे.

जेएमएम 22 जागांवर आघाडीवर आहे आणि 8 जागांवर विजयी झाली आहे. काँग्रेस 11 जागांवर आघाडीवर असून 4 जागांवर विजयी झाली आहे. तसेच, आरजेडी एका जागेवर आघाडीवर असून जेएमएम-कांग्रेस-राजद यांची महायुती आहे.

एका वर्षात पाच राज्यात गमावली भाजपने सत्ता :

झारखंड विधानसभा निवडणुकीचे निकाल आता जवळपास स्पष्ट झाले आहेत. भाजपने झारखंडमधील सत्ता गमावली असल्याचं चित्र दिसून येत आहे. गेल्या वर्षीपर्यंत देशातील दोन तृतीयांश राज्यांमध्ये भाजपची सत्ता होती. मात्र गेल्या वर्षीपासून भाजपने अनेक राज्यातील आपली सत्ता गमावली आहे. काही दिवसांपूर्वीच भाजपने महाराष्ट्रातील सत्ता गमावली होती. गेल्यावर्षीपर्यंत भाजपची 21 राज्यांमध्ये सत्ता होती, मात्र सध्या 15 राज्यात सत्ता उरली आहे

2014 निवडणुकांचे निकाल : 
भाजप : 37
आजसू : 5
जेव्हिएम : 8
जेएमएम : 19
काँग्रेस : 6
अन्य : 6


निवडणुकांच्या हाती आलेल्या कलांनुसार, भाजपला बहुमत सिद्ध करणं अशक्य असल्याचे स्पष्ट झालं आहे आणि भाजपच्या हातून आणखी एक राज्य निसटलं आहे. याबाबत बोलताना मुख्यमंत्री रघुवर दास म्हणाले की, हा पक्षाची नाहीतर माझा पराभव आहे. दरम्यान, रघुवर दास यांचा जमशेदपूरमध्ये पराभव होऊ शकतो. भाजपाच्या पराभवानंतर रघुवर दास यांनी मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा दिला आहे.

संबंधित बातम्या : 

Jharkhand Election Results 2019 | महाराष्ट्रापाठोपाठ झारखंडही भाजपकडून निसटलं, काँग्रेस-जेएमएमचं सरकार निश्चित

Jharkhand Election Results 2019: दोन राज्य एक निकाल

Jharkhand Election Results 2019: भाजपसाठी धोक्याची घंटा... एका वर्षात पाच राज्यांतील गमावली सत्ता