मुंबई : मुंबईत दहीहंडी उत्सवाचा (Dahihandi 2023) उत्साह दिसून येत असताना दुसरीकडे थरावरून कोसळल्याने काही गोविंदा (Govinda) जखमी झाल्याने सणाला गालबोट लागले आहे. मुंबईत रात्री 9 वाजेपर्यंत 107 गोविंदा जखमी झाल्याची माहिती मुंबई महापालिकेने (BMC) दिली. यापैकी 14 गोविंदाची प्रकृती गंभीर असून त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. तर, 62 जणांना प्राथमिक उपचारानंतर घरी सोडण्यात आले आहे. 31 गोविंदावर ओपीडीमध्ये उपचार सुरू आहेत. ही आकडेवारी मुंबई महापालिकेने दिली असून रात्री 9 वाजेपर्यंतची आहे. त्यामुळे रात्री उशिरापर्यंत जखमी गोविंदांचा आकडा वाढण्याची शक्यता आहे. तर, ठाण्यात 17 गोविंदा जखमी झाल्याची माहिती देण्यात आली आहे. यातील कोणालाही गंभीर दुखापत झाली नसल्याची माहिती प्रशासनाने दिली.
मागील काही दिवसांपासून दडी मारलेल्या पावसाने आज दमदार हजेरी लावल्याने गोविंदा पथकांचा उत्साह आणखीच शिगेला पोहचला. चाळीतील गल्लींपासून ते राजकीय पक्षांनी आयोजित केलेल्या लाखोंच्या कार्यक्रमात गोविंदांचा उत्साह ओसंडून वाहत होता. काही ठिकाणी आठ थर तर काही ठिकाणी 9 थर रचण्यात आले आहे. रात्री 10 वाजेपर्यंत कोणत्याही गोविंदा पथकाला 10 थर लावता आले नाही. ठाण्यात 'जय जवान' गोविंदा पथकाने प्रयत्न केला. मात्र, त्यांना अपयश आले.
कोणत्या रुग्णालयात किती जखमींवर उपचार सुरू?
मुंबई शहर:
केईएम रुग्णालय : 31 दुखापत (07 दाखल, 23 उपचाराधीन, 1 डिस्चार्ज)
लोकमान्य टिळक, सायन रुग्णालय : 07 जखमी (डिस्चार्ज)
नायर रुग्णालय: 3 जखमी (डिस्चार्ज)
जे जे रुग्णालय : 3 जखमी (डिस्चार्ज)
हिंदुजा हॉस्पिटल- शून्य
सेंट जॉर्ज रुग्णालय : 03 जखमी (डिस्चार्ज)
जीटी रुग्णालय : 2 जखमी (OPD डिस्चार्ज)
पोद्दार हॉस्पिटल : 16 जखमी (6 उपचाराधीन, 10 डिस्चार्ज)
एस एल रहेजा रुग्णालय : शून्य
बॉम्बे रुग्णालय : एक जखमी (उपचार सुरू)
जसलोक रुग्णालय- शून्य
पूर्व उपनगर :
राजावाडी रुग्णालय : 10 जखमी (2 अॅडमिट, 8 डिस्चार्ज)
एमटी अग्रवाल हॉस्पिटल : 1 जखमी
वीर सावरकर रुग्णालय : 1 ( रुग्णालयात दाखल)
शतब्दी रुग्णालय : 3 जखमी (1 उपचाराधीन, 2 डिस्चार्ज)
सर्वोदय रुग्णालय : शून्य
पश्चिम उपनगर :
वांद्रे भाभा रुग्णालय : 3 जखमी (1 दाखल, 2 डिस्चार्ज)
व्ही एन देसाई रुग्णालय : 4 जखमी (डिस्चार्ज)
कूपर हॉस्पिटल : 6 जखमी (२ दाखल, 4 डिस्चार्ज)
भगवती रुग्णालय- शून्य
ट्रॉमा केअर हॉस्पिटल- 4 जखमी (डिस्चार्ज)
BDBA रुग्णालय- 9 जखमी (1 दाखल, 8 डिस्चार्ज)
एस के पाटील रुग्णालय- शून्य
नानावटी रुग्णालय- शून्य
ठाण्यात 17 जखमी गोविंदा
ठाणे शहरात दहीहंडी दरम्यान गोविंदा अपघात होऊन 17 गोविंदा जखमी झाले आहेत. त्यातील 11 जखमी गोविंदावर कळवा येथील छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयात उपचार करण्यात आले. तर, सहा जखमी गोविंदावर जिल्हा शासकीय रुग्णालयात उपचार करण्यात आले. कोणताही गोविंदा गंभीर जखमी झाला नसल्याची माहिती प्रशासनाने दिली आहे.