मुंबई :  मुंबई, ठाण्यात आज दहीहंडीचा (Dahihandi 2023) चांगलाच उत्साह दिसून आला. मागील काही दिवसांपासून दडी मारलेल्या पावसाने आज दमदार हजेरी लावल्याने गोविंदा पथकांचा उत्साह आणखीच शिगेला पोहचला. चाळीतील गल्लींपासून ते राजकीय पक्षांनी आयोजित केलेल्या लाखोंच्या कार्यक्रमात गोविंदांचा उत्साह ओसंडून वाहत होता. काही ठिकाणी आठ थर तर काही ठिकाणी 9 थर रचण्यात आले आहे. सायंकाळपर्यंत 10 थरांचा विक्रम रचला नव्हता. दरम्यान, दुपारी तीन वाजेपर्यंत मुंबई महापालिकेच्या रुग्णालयात 35 जखमी गोविंदांना उपचारासाठी दाखल करण्यात आले होते.


मुंबई, ठाण्यात पारंपरीक आणि मोठ्या दहीहंडीचाही उत्साह दिसून आला. दादर येथील आयडियल बुक डेपोजवळ  महाराष्ट्र प्रदुषण नियंत्रक मंडळाच्या माध्यमातून दहीहंडी साजरी करण्यात आली. या ठिकाणी पर्यावरण विषयावरील पथनाट्य सादर करण्यात आली. या ठिकाणी,  महिला, दिव्यांगांनी दहीहंडी साजरी केली. 


35 गोविंदा जखमी, रुग्णालयात उपचार


मुंबई महापालिकेच्या रुग्णालयांमध्ये दुपारी 3 वाजेपर्यंत 35 जखमी गोविंदांची नोंद करण्यात आली. यापैकी 4 जणांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. तर, 9 जणांना डिस्चार्ज करण्यात आले. 22 जणांवर ओपीडीमध्ये उपचार करण्यात आले असल्याची माहिती मुंबई महापालिकेने दिली. या आकडेवारीत खासगी रुग्णालयात उपचार करणाऱ्या गोविंदाचा समावेश नाही. 


मुंबई, ठाण्यात राजकीय नेत्यांकडून दहीहंडीचे आयोजन


आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर आज मुंबई, ठाण्यात राजकीय नेत्यांची रेलचेल दिसून आली. वर्तक नगर येथे प्रताप सरनाईक यांच्या संस्कृती युवा प्रतिष्ठानने दहीहंडीचे आयोजन केले होते.  मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह विविध कलाकारांनी उपस्थित राहत गोविंदा पथकाचा उत्साह वाढवला. 


टेंबी नाका येथे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी या दहीहंडी उत्सवाचे आयोजन केले. या ठिकाणीही अनेक गोविंदा पथकांनी हजेरी लावली. अवधूत गुप्ते आणि इतर सेलिब्रिटींनी हजेरी लावत गोविंदांचा उत्साह वाढवला. शिवसेना ठाकरे गटाचे खासदार राजन विचारे यांच्यावतीने दहीहंडीचे आयोजन करण्यात आले. 


मुंबईत आज भाजपच्या वतीने 400 दहीहंडीचे आयोजन करण्यात आलेले आहे. लालबागमध्ये भाजपने बदलाची दहीहंडी उभारली. तर वरळीत परिवर्तनाच्या दहीहंडीचे आयोजन करण्यात आले होते. 


घाटकोपर येथे आमदार राम कदम, दादरमध्ये शिवसेना भवनजवळ युवासेनेकडून  निष्ठा दहीहंडीचे ही आयोजन करण्यात आले होते. तर, आमदार प्रकाश सुर्वे मागाठणे येथे दहीहंडीचे  आयोजन केले. या दहीहंडी उत्सवात विविध राजकीय नेत्यांसह मराठी, हिंदी चित्रपटातील कलाकारांनी हजेरी लावली.


आळंदीत श्री संत ज्ञानेश्वर महाराज समाधी मंदिरात कृष्ण जन्माष्टमीचा उत्साह


आळंदीत श्री संत ज्ञानेश्वर महाराज समाधी मंदिरात कृष्ण जन्माष्टमी मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. यावेळी समाधी मंदिराचा गाभारा आकर्षक फुलांनी सजवण्यात आला असून समाधीवर श्रीकृष्णाचा अवतार रेखाटण्यात आला होता. भाविकांनी जन्माष्टमीसाठी मोठ्या प्रमाणामध्ये मंदिर परिसरामध्ये गर्दी केली होती. 


पंढरपूर विठ्ठल मंदिरात जन्माष्टमीचा उत्सव साजरा 


विठ्ठल मंदिरात रात्री 12 वाजता कृष्ण जन्मोत्सव साजरा झाला. यावेळी शेकडो विठ्ठल भक्ताने या सोहळ्यासाठी हजेरी लावली होती. यापूर्वी विठुरायाला अनोख्या रुपात सजविण्यात आले होते. डोक्यावर पगडी, अंगावर अंगी, धोतर आणि त्यावर मोठी कुंची घालण्यात आली होती. गुरख्याचे रूप दिलेल्या विठुरायाच्या हातात चांदीची काठी देऊन देवाच्या मागे मोरपिसे लावण्यात आली होती. विठुराया हा विष्णूचा अवतार असल्याने विठ्ठल मंदिरात जन्माष्टमीचा उत्सव मोठ्या उत्साहात साजरा होत असतो.


शिर्डीच्या साई मंदिरात कृष्णजन्माष्टमीचा उत्साह


शिर्डीच्या साईबाबा मंदिरातही हा उत्सव श्रद्धने आणि उत्साहात साजरा करण्यात येत आहे. रात्री बारा वाजता चांदीच्या पाळण्यात बाल कृष्णाची मूर्ती ठेवून कीर्तन झाल्यानंतर कृष्णजन्माचे स्वागत करण्यात आले. आज दिवसभर साई समाधी शेजारी गोपाल कृष्णाचा फोटो ठेवून त्याची पूजा करण्यात आली. 


डोंबिवलीत गतिमंद विद्यार्थ्यांची दहीहंडी


डोंबिवलीतील क्षीतिज संस्थेच्या शाळेत शिकणाऱ्या गतिमंद विद्यार्थ्यांनी दहीहंडी फोडून उत्सव साजरा केला.