मुंबई : "शरद पवार आणि देवेंद्र फडवीस यांच्या भेटीकडे राजकीय हेतूने पाहणं चुकीचं आहे. शरद पवारांनी या भेटीत देवेंद्र फडणवीस यांना मार्गदर्शन केलं असेल," अशी प्रतिक्रिया शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी दिली. मुंबईत माध्यमांशी त्यांनी संवाद साधला.
विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी सोमवारी (31) राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांची भेट घेतली. स्वत: फडणवीस यांनी ट्वीट करत भेटीचा फोटो पोस्ट करत माहिती दिली. महाराष्ट्राच्या राजकारणात काल संपूर्ण दिवस या भेटीची चर्चा रंगली होती. या भेटीनंतर महाराष्ट्राचं राजकारणाला नवं वळण मिळणार का, असंही म्हटलं जात आहे.
या भेटीविषयी आज (1 जून) संजय राऊत यांना विचारलं असता ते म्हणाले की, "शरद पवारांची तब्येत किंचित बरी नाही, ही सदिच्छा भेट आहे. ही महाराष्ट्राची परंपरा आहे. इतर राज्यांप्रमाणे महाराष्ट्रातील राजकारणात शत्रूत्व घेऊन बसत नाही. जाणं-येणं असतं, एकमेकांशी चर्चा असते. त्यामुळे या भेटीकडे राजकीय हेतूने पाहणं चुकीचं आहे."
"महाविकास आघाडी सरकारला कोणत्या प्रकारचं सहकार्य विरोधी पक्षाने करणं गरजेचं आहे या संदर्भात पवारांनी फडणवीसांना मार्गदर्शन केलं असावं. या राज्याला विरोधी पक्षांची मोठी परंपरा आहे. शरद पवारही विरोधी पक्षनेते होते. त्यांनी त्यावेळी उत्तम काम केलं होतं. त्यामुळे फडवणीसांनी जर त्यांची भेट घेतली असेल तर त्यांना चांगलं मार्गदर्शन केलं असावं," असं संजय राऊत यांनी सांगितलं.
ऑपरेशन लोटस महाराष्ट्र किंवा बंगालमध्ये होणार नाही : संजय राऊत
पवार आणि फडणवीस यांच्या भेटीनंतर महाराष्ट्रात ऑपरेशन लोटसची चर्चा पुन्हा सुरु झाली. "ऑपरेशन लोटस विसरुन जा. ऑपरेशन लोटस ना बंगालमध्ये ना महाराष्ट्रात. देवेंद्र फडणवीस महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आहेत, विद्यमान विरोधी पक्षनेते आहेत. शरद पवार हे महाराष्ट्रासह देशातील मोठ नेते आहेत. त्यांची तब्येत काहीशी बरी नाही, त्यामुळे ही सदिच्छा भेट होती," असं संजय राऊत यांनी नमूद केलं.
पवार-फडणवीस यांच्या भेटीनंतर राष्ट्रवादीची बैठक?
दरम्यान शरद पवार आज राष्ट्रवादीच्या सर्व मंत्र्यांशी चर्चा करणार आहेत. आज संध्याकाळी ही बैठक होणार आहेत. देवेंद्र फडणवीस यांच्या भेटीनंतरच राष्ट्रवादीच्या मंत्र्यांची बैठक होत असल्याची चर्चा रंगली आहे. यावर संजय राऊत म्हणाले की, "पाच दिवसांपूर्वी मी पवारांना भेटलो होतो. त्याआधी वर्षा बंगल्यावर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि शरद पवार यांची भेट झाली होती. प्रत्येक भेटीचा असा राजकीय अर्थ काढू नये. राष्ट्रवादीची अंतर्गत बैठक असेल, त्यांना पक्षाचे प्रमुख मार्गदर्शन करणार असतील त्यात राजकारण म्हणून कशाला पाहायचं?"