नवी मुंबई : प्रेयसीने लग्नासाठी तगादा लावत धमकी दिल्याने प्रियकराने चक्क केटामाईन इंजेक्शन देऊन तिचा खून केल्याची धक्कादायक घटना पनवेलमध्ये घडली आहे. पनवेल शहर पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे. चंद्रकांत गायकर असं आरोपीचं नाव असून तो एका खासगी रुग्णालयात वॉर्डबॉय म्हणून काम करतो.
नियोजित नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या हद्दीत 29 मे रोजी महिलेचा मृतदेह पोलिसांना सापडला होता. शरीरावर कोणत्याही जखमा नसल्याने पोलिसांनी सुरुवातीला अपघाती मृत्यूची नोंद केली. त्यानंतर 30 मे रोजी एका रिक्षाचालकाला आधारकार्ड, पॅनकार्ड, पर्स आणि कपडे असलेली पिवळी पिशवी सापडली. रिक्षाचालकाने ही पिशवी पोलिसांना दिली आणि त्यावरुन मृत महिलेची ओळख पटली. हा मृतदेह आपल्या बहिणीचा असल्याचं सांगत तिचा खून झाल्याचा संशय महेश ठोंबरे यांनी व्यक्त केला होता.
मृत महिलेचे आरोपी चंद्रकांत गायकर या व्यक्तीबरोबर संबंध होते. परंतु काही दिवसांपूर्वी दोघांमध्ये भांडण झाल्याचं पोलिसांना समजलं. पोलिसांनी तुरमाळे इथे राहणाऱ्या आरोपी चंद्रकांत गायकरला ताब्यात घेऊन चौकशी केली असता त्याने गुन्ह्याची कबुली दिली. आरोपी चंद्रकांत गायकर हा खाजगी रुग्णालयात वॉर्डबॉय म्हणून काम करतो.
गेल्या सहा महिन्यांपासून आपले महिलेसोबत प्रेमसंबंध होते. मात्र तिने माझ्याकडे लग्नासाठी तगादा लावला होता. शिवाय यासाठी धमकी देऊन भांडण काढत होती. याला कंटाळून आपण तिला मारण्याचं ठरवलं, असं त्याने पोलिसांना सांगितलं. संबंधित महिलेला आजार असल्याने त्यातून बरं करतो असं सांगून तिला निर्जन स्थळी नेत वेगवेगळे चार इंजेक्शन दिले. यानंतर केटामाईन हे विषारी इंजेक्शन देऊन तिची हत्या केल्याची कबुली आरोपीने पोलिसांना दिली आहे.