मुंबई : मनसेने मुंबईत आयपीएलची बस फोडल्यानंतर आता पक्षाचे सरचिटणीस संदीप देशपांडे यांनी राज्याचे पर्यटनमंत्री आदित्य ठाकरे यांच्यावर निशाणा साधला आहे. "महाराष्ट्रामध्ये आयपीएलचे सामने भरवून जर स्थानिक भूमिपुत्रांना फायदा होणार नसेल तर हा सगळा पुढाकार स्वतःचं अर्थचक्र फिरवायला घेतलाय की महाराष्ट्राचं, हा आमचा प्रश्न आहे पर्यटनमंत्र्यांना", असं देशपांडे यांनी म्हटलं आहे.
स्वतःचं अर्थचक्र फिरवायला घेतलाय की महाराष्ट्राचं? : संदीप देशपांडे
आयपीएल खेळाडूंच्या वाहतूक व्यवस्थेचे काम मुंबईतील किंवा महाराष्ट्रातील स्थानिक व्यावसायिकांना न दिल्याने मनसेच्या वाहतूक सेनेने मंगळवारी (15 मार्च) मुंबईत आयपीएलची बस फोडली. आयपीएलची बस फोडल्यानंतर मनसेने आपला मोर्चा आदित्य ठाकरे यांच्याकडे वळवला आहे. संदीप देशपांडे म्हणाले की, "आयपीएल इथे आल्यावर इथलं अर्थचक्र फिरेल, इथल्या लोकांना रोजगार मिळेल. ट्रान्सपोर्टेशन असेल किंवा आयपीएलच्या अनुषंगाने येणारे आणखी काही रोजगार असतील, याची कामं जर यूपी आणि दिल्लीच्या लोकांना मिळणार असतील तर महाराष्ट्रातील अर्थचक्र कसं फिरणार? महाराष्ट्रामध्ये आयपीएलचे सामने भरवून जर स्थानिक भूमिपुत्रांना फायदा होणार नसेल तर हा सगळा पुढाकार स्वतःचं अर्थचक्र फिरवायला घेतलाय की महाराष्ट्राचं, हा आमचा प्रश्न आहे पर्यटनमंत्र्यांना."
IPLची बस फोडल्यानंतर मनसेचं स्पष्टीकरण; म्हणाले, हक्क नाही मिळाला तर...
मनसेने आयपीएलची बस फोडली
आयपीएल जर महाराष्ट्रात होत असेल आयपीएलची वाहतूक व्यवस्था स्थानिक कंपन्यांना कंत्राट देऊन करावी, अशी मागणी मागील आठवडाभरापासून मनसे वाहतूक सेनेचे अध्यक्ष संजय नाईक यांच्याकडून केली जात होती. त्यासाठी त्यांनी आईपीएल व्यवस्थापन त्यासोबतच परिवहन मंत्र्यांकडे सुद्धा पत्र देऊन मागणी केली. मात्र या मागणीला कुठल्या प्रकारचा प्रतिसाद मिळाला नाही आणि या वाहतूक व्यवस्थेचे कंत्राट महाराष्ट्राबाहेरील कंपन्यांना देण्यात आल्याने मनसे आक्रमक झाली.
वाहतूक सेनेच्या पदाधिकाऱ्यांनी खेळाडूंसाठी आलेली बस मंगळवारी रात्री फोडली आहे. मुंबईच्या ताज हॉटेलसमोर उभी असलेली लक्झरी बस मनसे पदाधिकाऱ्यांनी फोडून या सर्व गोष्टीचा निषेध व्यक्त केला आहे.
मनसे वाहतूक सेनेची प्रतिक्रिया
महाराष्ट्रात होणारे आयपीएलच्या सामन्यातील वाहतूक व्यवसाय हा महाराष्ट्रातील व्यावसायिकांना डावलून बाहेरच्यांच्या घशात घालायचा प्रयत्न सुरु होता. आयपीएल व्यवस्थापन आणि सरकार दरबारी विनंती करुनही काहीही होत नव्हते. त्यामुळे मनसेने हा दणका दिला आहे, अशी प्रतिक्रिया महाराष्ट्र नवनिर्माण वाहतूक सेनेचे अध्यक्ष संजय नाईक यांनी दिली आहे.