International Day of Persons with Disabilities : राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM EKnath Shinde) यांनी आज स्वतंत्र दिव्यांग मंत्रालय स्थापन करण्यात आल्याची घोषणा केली आहे. स्वतंत्र  दिव्यांग मंत्रालयात 2063 पदे भरली जाणार आहेत, शिवाय यासाठी 1143 कोटी रुपये राज्य सरकारने दिले आहेत, असंही मुख्यमंत्र्यांनी सांगितलं. 


मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले की, आज जागतिक दिव्यांग दिन आहे. स्वतंत्र दिव्यांग मंत्रालय असला पाहिजे अशी आपली सगळ्यांची भावना होती.  हे राज्य सर्वसामान्यांच्या हितासाठी सुरू झालं आहे.  या राज्यात लोकांच्या हिताचेच निर्णय होणार आहेत. आज सोन्याचा दिवस दिव्यांगांसाठी आहे.  आपलं सरकार आल्यानंतर तुम्हाला दिव्यांग मागण्यांसाठी आंदोलन करावं लागलं नाही. राज्यात स्वतंत्र दिव्यांग मंत्रालयाची आज मी घोषणा करत आहे, असं शिंदे म्हणाले.


सेक्रेटरी दर्जाचा अधिकारी

या स्वतंत्र मंत्रालयासाठी 2063 पदे यासाठी निर्माण होतील, तसेच सेक्रेटरी दर्जाचा अधिकारी यासाठी असेल. तुमच्या कल्याणासाठी जे जे आवश्यक आहे, ते सगळं हे मंत्रालय करेल. कुठलंही धोरण ठरवताना आता दिव्यांगांचं मत सुद्धा जाणून घेतले जाईल. हा निर्णय फक्त 24 दिवसात झालाय, दिव्यांग मंत्रालय आपण स्थापन केला आहे. बाळासाहेब ठाकरे यांना सुद्धा दिव्यांगांबद्दल तळमळ होती. केंद्र सरकार, नरेंद्र मोदी यांनी आश्वस्त केलं आहे की, या मंत्रालयासाठी कुठेही पैसेही कमी पडणार नाहीत, असंही मुख्यमंत्री म्हणाले. 


'आयुष्यभर रोखीने व्यवहार केला त्यांना खोक्याशिवाय काय दिसणार'


मुख्यमंत्र्यांनी खोक्याचा प्रश्न विचारला असता म्हटलं की, बच्चू कडूंसारखा माणूस कधी खोके घेईल का? आरोपाची टीकेची सुद्धा स्पर्धा सुरू आहे, आरोपाला टिकेला उत्तर कामाने मिळणार आहे. खोके सरकार म्हणणाऱ्यांची डोके तपासण्याची गरज आहे. ज्या माझ्या दिव्यांग बांधवांना जमते ते तरी त्या रिकाम्या डोक्यावाल्यांना समजलं तर या राज्यात खूप मोठा बदल होऊन जाईल, असंही ते म्हणाले. ज्यांनी आयुष्यभर रोखीने व्यवहार केला त्यांना खोक्याशिवाय काय दिसणार, असंही ते म्हणाले. या दिव्यांगचा प्रेम ज्यांना मिळेल, त्यांना प्रेरणा मिळेल मात्र ज्यांना त्यांचा शाप मिळेल त्याला काय मिळेल? असा सवालही त्यांनी केला. तसेच आंदोलनात सामील झालेल्या दिव्यांगवरील गुन्हे आम्ही मागे घेण्यासंदर्भात गृह विभागाशी बोलतो, असंही ते म्हणाले.


ही बातमी देखील वाचा


राज्य सरकारकडून 'त्या' निर्णयाला मंजूरी; अशोक चव्हाणांनी मानले शिंदे-फडणवीस सरकारचे आभार, पोस्ट चर्चेत